नीरा देवघरचे संपूर्ण श्रेय रामराजे यांचेच - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर शेजारी आ. दिपकराव चव्हाण व अन्य मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - फलटण तालुक्या मध्ये कोणत्याही विकास कामाबाबत ते काम आम्हीच केले असा आयत्या पीठावर रेघोट्या मारण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु असून नीरा - देवघर धरणाचे संपूर्ण श्रेय हे रामराजे यांचेच असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत खराडेवाडी ता. फलटण येथील ४ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या साठवण तलाव व उंच टाकी भूमिपूजन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी आ. दीपकराव चव्हाण, माजी सभापती शंकरराव माडकर, महानंदचे संचालक डी. के. पवार, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहुराज भोसले, संचालक रमेश बोंद्रे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक अंकुशराव साळुंखे पाटील, राहुल नाईक निंबाळकर, साखरवाडी तंटामुक्ती उपाध्यक्ष दिलीप पवार, दत्तात्रय वाघ, किशोर नाईक निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, किरण साळुंखे पाटील, अभयसिंह निंबाळकर उपस्थित होते.
सन १९९५ मध्ये श्रीमंत रामराजे अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प. महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांना बरोबर घेऊन त्यांनी राज्यातील तत्कालीन युती शासनास पाठिंबा दिला, त्याबदल्यात शासनाने कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करुन त्यामाध्यमातून नीरा - देवघर व अन्य धरणांच्या उभारणीस निधी व अन्य मान्यता दिल्याने, राज्याच्या हक्काचे पाणी कर्नाटक व इतर राज्यांना न जाता, ते सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये अबाधीत ठेवले असल्याने, फलटण तालुक्याची कायम दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसण्याचे श्रेय रामराजेंनाच द्यावे लागेल असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक घरात शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार एकूण खर्चाच्या ५० टक्के निधी राज्य शासन व ५० टक्के निधी केंद्र शासन उपलब्ध करुन देणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार फलटण तालुक्यात या योजनेंतर्गत सुमारे ३५० कोटी रुपये किमतीची कामे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
त्याच योजनेतून खराडेवाडी, ता. फलटण येथे ४ कोटी ५० लाख रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत. कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाईल याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण खराडेवाडी ग्रामस्थांनी गावात झालेल्या विकास कामाची पोहच पावती म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन आ. दीपकराव चव्हाण यांनी यावेळी केले.
प्रा. रवींद्र टिळेकर सर यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात खराडेवाडी सारख्या छोट्या गावामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी न भूतो न भविष्यती अशी विकास कामे केली असून भविष्यात संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी खराडेवाडीच्या सरपंच कुसुमताई खराडे, उपसरपंच समीर पठाण, सोमनाथ टिळेकर, युनूस पठाण, सतीश टिळेकर, कांतीलाल भुजबळ, नामदेव खराडे, यशवंत खराडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments