मराठा क्रांती मोर्चा काढणार गावागावात शाखा
झडकबाईचीवाडी ता.फलटण येथे मराठा क्रांती मोर्चा बैठकीत उपस्थित मराठा समाज बांधव |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - मराठा समाजातील लोकांना इतरांकडून विनाकारण त्रास दिला जात असून, त्यास पायबंद घालण्यासाठी, मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने विनाकारण त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, अशा त्रास होणाऱ्या मराठा समाजातील लोकांनी आता न घाबरता मराठा क्रांती मोर्चाकडे लेखी अथवा तोंडी तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान यासाठी फलटण तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडी वस्तीवर मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने जागरूकता निर्माण करून समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी समाजातील लोकांनी राजकारण विरहित सहभागी होऊन, संपूर्ण फलटण तालुक्यातील मराठा समाजाने एकदिलाने मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटणने केले आहे.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने मराठा समाज राजकारण विरहित एकत्र यावा यासाठी सर्व गावात मराठा क्रांती मोर्चा च्या शाखा निर्माण करण्यात येणार आहेत, त्याची सुरुवात होऊन, आज पहिली बैठक झडकबाईचीवाडी ता.फलटण येथे घेण्यात आली. यावेळी मराठा समाजातील तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,त्यासाठी तरुण बांधव,भगिनी व युवकांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी असेही सांगण्यात आले आहे.
No comments