फलटण ग्रामीण पोलिसांकडून गोधन चोरीचे ७ गुन्हे उघडकीस ; ३३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल ताब्यात
अटक केलेल्या संशयीतांसह फलटण ग्रामिण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ : तालुक्यात मागील काही महिन्यांपासून दुभत्या गायींच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, एकूण ७ गुन्हे उघडकीस आणत, गोधन व दोन वाहने असा तब्बल ३३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माण तालुक्यातील तिघांना अटक केली असून आणखी तिघे संशयीत फरार आहेत.
विनोद निवृत्ती खरात, संतोष शामराव सोनटक्के दोघेही रा. भांडवली ता. माण, सतिश रमेश माने रा. तोंडले ता. माण अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, फलटण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासुन ग्रामीण भागातुन दुभत्या गायींची मोठ्या प्रमाणात चोरी होत होती, यामुळे शेतकरी वर्गास मोठा आर्थिक फटका बसत होता. याबाबत पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी संबंधित गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक करण्याच्या सुचना केल्या होत्या, त्यानुसार पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषानानुसार वरील तीनही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू पोलिसांनी केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामध्ये त्यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत तिन ठिकाणी, औंध पोलिस ठाणे, मेढा पोलिस ठाणे व लोणंद पोलिस ठाणेच्या हद्दित एकुण सात गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील सुमारे ३३,५०,००० / - रुपये किंमतीच्या नऊ जर्सी गाई व दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील आणखी तिघे संशयीत फरारी असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संबधित अटक केलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षीत, सहाय्यक पोलीस फौजदार भीकू राऊत, पोलिस नाईक अभिजीत काशिद, अमोल जगदाळे, पोलिस काँस्टेबल महेश जगदाळे, विक्रम कुंभार यांचा सहभाग होता.
No comments