Breaking News

१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी केले दोघांना जेरबंद

The police arrested two people in the case of embezzlement of Rs 1 crore

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ : वैदेही मल्टीस्टेट ॲग्रो को - ऑपरेटीव्ह सोसायटी साखरवाडी ता. फलटण जि. सातारा येथील कंपनीत सुमारे १ कोटी ८ लाख रुपये रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद असणारे व गेल्या आठ महिन्यांपासुन पोलिसांना गुंगारा देणारऱ्या दोघा संशयीतांना पुणे व वाई येथे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 

        सोमनाथ खंडु नेहे रा. एकदंत अपार्टमेंट, ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशिक व ज्ञानेश्वर तुकाराम गाढवे रा. बोपर्डी ता. वाई अशी दोघांची नावे आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषन, सातारा यांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. वैदेही मल्टीस्टेट ॲग्रो को - ऑपरेटीव्ह सोसायटी साखरवाडी ता. फलटण येथील कंपनीत चेअरमन, संचालक व इतर यांनी सामान्य जनतेला आमिष दाखवून त्यांना कंपनीच्या विविध प्लॅनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगुन, त्यास योग्य तो परतावा देण्याचे सांगुन, सामान्य जनतेची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०२२ फलटण ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांच्याकडे होता. यातील संशयीत आरोपी सोमनाथ नेहे हा पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यास सापळा रचुन ताब्यात घेतले तर ज्ञानेश्वर गाढवे यास बोपर्डी ता. वाई परिसरातुन सापळा रचुन दि. ६ फेब्रुवारीला ताब्यात घेतले घेतले आहे. यातील सोमनाथ नेहे याच्यावर  विविध पोलिस ठाण्यात ३७ गुन्हे दाखल आहेत. त्याने या कंपनीच्या सातारा, वाई, फलटण, नाशिक, ठाणे, इस्लामपूर, दादर मुंबई, अलीबाग, रत्नागिरी, दापोली, चंद्रपूर या ठिकाणी शाखा काढुन तेथील गुंतवणुकदार यांना विश्वासात घेवून, त्यांना मोठया प्रमाणात पैशाचे अमिष दाखवुन त्यांचेकडून जमा झालेल्या रक्कमेचा अपहार केला, असल्याचे व सदर गुन्हयाच्या तपासात आजअखेर एक कोटी आठ लाख रुपये एवढ्या रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने वरील दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश गैंगजे, पोलिस हवालदार प्रशांत ताटे, पोलिस नाईक मनोज जाधव, संजय मोरे संतोष राऊत व पोलीस उपनिरीक्षक राजेश वायदंडे, पोलिस नाईक मनोज जाधव, संकेत माने यांचा या कारवाईमध्ये समावेश होता. सदर कामगिरीबद्दल संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे पोलिस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे..

No comments