विरोधकांना पराभव समोर दिसू लागलाय त्यामुळे आरडाओरडा सुरू केलाय - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ; फलटणची जनता माझीच राहणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - निवडणुका जवळ आलेल्या आहेत, विरोधकांना आता पराभव समोर दिसू लागला आहे, त्यामुळे विरोधकांनी सगळीकडून आरडाओरडा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच आज शुक्रवार पेठेतून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले व विरोधकांनी प्रचारासाठी कोणाला आणायचे त्याला आणावे, पण फलटण मधील जनता ही माझीच राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी जिंकण्याच्या दृष्टीने पावले टाकायची आहेत हे लक्षात ठेवावे, स्वतः नगरसेवक होण्यासाठी तुम्ही पावले टाकता हा तुमचा अधिकार आहे, पण गट, पक्ष, नेतृत्व सोडून तुम्हाला जमणार नाही, त्यासाठी आपल्यात फूट पडू देऊ नका असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी केले. नगरसेवक जे एकमेकांशी भांडत असतात, अजून काही उद्योग करत असतात, त्यांच्याकडेही आगामी निवडणुकीत मी पाहणार आहे असा इशारा श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिला.
शुक्रवार पेठ, फलटण येथे कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी शुक्रवार पेठेतील ज्येष्ठ कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
विरोधकांची सत्ता येऊ शकत नाही
कार्यकर्त्यांना सल्ला देताना श्रीमंत रामराजे म्हणाले की आपापसातले वाद मिटवून एकत्रित या! आपापसात वाद लावण्यात विरोधक एक्सपर्ट आहेत, सध्या फलटण शहर व तालुक्यातील वातावरण वेगळ्या पद्धतीचे आहे, कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, फोन करून दम दिले जात आहेत, याला राजकारण म्हणतात का? अशा चुकीच्या पद्धतीने फलटणमधील राजकारण सध्या सुरू आहे. परंतु तुम्ही लोकांनी जर एकत्रित येऊन ठरवलं तर, विरोधकांची सत्ता येऊ शकत नाही. आपापसात असणारे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, काहींना संधीची अपेक्षा असते परंतु जे सर्वांना विश्वासात घेऊन, काम करतील त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटणमध्ये राज्य हे ‘श्रीरामा’चेच
फलटण शहरात आणि तालुक्यात विरोधकांकडून खोटे बोलले जात आहे, गावागावात सामाजिक माध्यमाचा वापर करून वेगळे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे, राज्यात सत्तांतर झाले आहे, पण फलटण मध्ये सत्तांतर झालेले नाही, जो पर्यंत जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत सत्तांतर होऊ देणार नाही, मग कोणीही येऊ देत असे खुले आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना देऊन, विरोधकांनी राज्यातून व देशातून कितीही नेते मंडळींना आणू द्यात परंतु फलटणमध्ये राज्य हे फलटणच्या ‘श्रीरामा’चेच राहणार आहे असा मिश्किल टोला विरोधकांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी लगावला.
नीरा देवघर बाबत श्रेयवादाचे राजकारण
सध्या विरोधकांकडून नीरा देवघर प्रकल्प संदर्भात श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे, विरोधक म्हणतात की निरादेवघरचे पाणी बारामतीकरांनी पळवले, जर त्यांना पाणीच पाहिजे असते, तर त्यांनी धरण होऊ दिले नसते. मी आमदार झाल्यानंतर मीच निरा देवघरचे भूमिपूजन व टेंडर काढली, नीरा देवघर धरण झाले ते माझ्या प्रयत्नांमुळे.
त्यापुढे ६६ किलोमीटर पर्यंत पाणी आणले आणि त्याचे श्रेय विरोधकांनी घ्यायचे हे चुकीचे आहे. निरा देवघरचे पाणी पुढे पाईपलाईनने आणण्याचं सुरू आहे, त्याचे श्रेय विरोधक घेत आहेत, परंतु हा निर्णय जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना झाला आहे. दोन दिवसात आपण निरा देवघर संबंधित प्रेस कॉन्फरन्स घेऊन सविस्तर सांगणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की सुप्रीम कोर्टात जरी ओबीसीचा निर्णय पेंडिंग असला तरी आपल्याला काही फरक पडत नाही कारण आपण सर्व जाती समाजांना सर्व धर्मांना आपल्या राजकारणात सामील करून घेतलेले आहे, फलटणची संस्कृती आपल्याला सोडून देता येणार नाही, ही परंपरा संस्थान काळापासून चालू असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
No comments