सुरज बोडरे टोळीला मोक्का ; १३ जणांवर कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १५ : साखरवाडी ता. फलटण परिसरात दहशत माजविणारऱ्या व विविध प्रकारचे तेवीस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुरज वसंत बोडरे या टोळी प्रमुखासह त्याच्या अन्य बारा साथीदारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार फलटणचे पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याच्यावतीने साखरवाडी व परिसरातील सुरज वसंत बोडरे, ज्ञानेश्वर वसंत बोडरे, उमेश संजय खोमणे, अमर पुंडलिक बोडरे, रणजीत कैलास भंडलकर, सचिन दत्तात्रय मंडले, तानाजी नाथाबा लोखंडे, शरद उर्फ बाबू नंदकुमार पवार, शंभू आनंदा ननावरे, वैभव हणमंत चव्हाण, सनी मोहन बोडरे, श्रीकांत गुलाब बोडरे व गणेश बाळू मदने यांच्या टोळीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करुन आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईकरीता पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. टोळी प्रमुख सुरज वसंत बोडरे व त्याच्या बारा साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, जबर दुखापत घडवणु आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, जबर दुखापत व गर्दी मारामारी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. साखरवाडी परिसरात दहशत निर्माण करुन या टोळीद्वारे येथील व्यावसायिकांनाही लक्ष करण्यात आले होते. या गुन्ह्याचा पुढिल तपास पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे हे करीत आहेत. सदर कारवाईमुळे जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान सदर टोळीत अन्य एका आरोपीवरही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. परंतू तो अल्पवयीन असल्याने त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई झाली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
No comments