शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसृष्टी आशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
पुणे दि.19: शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य आहे. लोकांना प्रेरणा देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, डॉ.प्रविण दबडगाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते.
शिवसृष्टीला भेट देताना कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण होते असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शिवसृष्टीचा हा उपक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा आज सुरू होत आहे. राज्य शासनाने यासाठी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकल्पाचे काम थांबणार नाही आणि अधिक वेगाने ते पूर्ण करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून देशाचा कारभार केला जात आहे. म्हणून शिवसृष्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज कुशल संघटक
छत्रपतींचे जीवीतकार्य हा महाराष्ट्राचा अभिमान होता. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी कार्य केले. ते कुशल संघटक, कुशल प्रशासक, कुशल निर्माते होते. दूरदृष्टी असलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून आदर्श उभा केला आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीचा दिवस सोहळ्याच्या रुपात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शिवाजी महाराज हे दैवी शक्ती होते. त्यांचा आदर्श समोर ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी शासन कार्य करीत आहे. जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा झाला नाही. त्यांनी जगासमोर आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण आपल्या कार्यातून प्रस्तूत केले. इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती याचा प्रत्यय येईल.
कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित स्थळांना भेट देऊन शिवरायांचा इतिहास जगभरात पोहोचवला. शिवाजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आपले वैभव आहे. गड-किल्ल्यांवर त्यांनी केलेल्या सुविधा अद्भूत आहेत. ते जतन करण्याचे कार्य राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. इथे येणारा प्रत्येकजण ऊर्जा घेऊन जाईल आणि संस्कारकेंद्र म्हणून याची ओळख स्थापित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
इतिहासातील सूक्ष्म बाबींना संशोधनपूर्वक मांडल्याने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय इथे दिसून येतो. इतिहासाला जीवंत रुपात साकारण्याचा हा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या जीवनसंदेशाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. देशभरातील शिवभक्तांसाठी आणि जगभरातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्वाचे स्थळ होईल.
छत्रपती शिवरायांचे कार्य देशभरातील जनतेला प्रेरित करणारे आहे. हे कार्य घरोघरी पोहोचविण्यात कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मोठे योगदान आहे. जगभरातील अधिकृत दस्तावेजाचे संकलन करून नव्या पिढीसाठी शिवचरित्राची रचना करून त्यांनी नव्या पिढीवर मोठे उपकार केले आहे. त्यांनी 12 हजारापेक्षा अधिक व्याख्याने आणि जाणता राजाचे 1200 पेक्षा अधिक प्रयोग करून शिवसृष्टीसाठी योगदान दिले. जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून युवकांवर देशभक्तीचे संस्कार प्रभाविपणे झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे देशाच्या इतिहासात मोठे योगदान
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्याची प्रेरणा सत्ता नव्हती, तर अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, स्वधर्माप्रती निष्ठेसाठी, स्वभाषेला महत्वाचे स्थान देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे जीवन होते. भारतावर कुणीही अत्याचार करू शकत नाही हा संदेश त्यांनी स्वराज्य स्थापना करून जगाला दिला. त्यांचा हा विचार त्यांच्या नंतरही प्रेरणादायी ठरलेला दिसून येतो. 1680 नंतरही त्यांच्या कार्याला, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. स्वराज्याची ही यात्रा अटक ते कटक आणि गुजरात ते बंगालपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण भारताला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात होते.
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी शिवरायांचा आग्रह
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी शिवाजी महाराज आग्रही होते. आपल्या संस्कृती आणि धर्मानुसार शासन चालावे असे प्रयत्न त्यांनी केले. स्वभाषेत राजव्यवहार कोष सर्वप्रथम तयार करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. स्वराज्यासोबत सुराज्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शासनाला आठ विभागात वर्गीकरण करून शासनाच्या कार्याला लिपीबद्ध करण्याचे कार्य केले. स्वराज्यासोबत सुराज्याची कल्पना त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे केली.
छत्रपती शिवाजी महाराज युद्धभूमीवर अग्रेसर राहून लढणारे साहसी योद्धा होते. एक कोटी सिंहांचे काळीज त्यांच्याकडे होते हे अफजलखान वधाच्या प्रसंगावरून दिसून येते. उपभोगशून्य राजा कसा असावा याचे उदाहरण महाराजांनी आपल्यासमोर ठेवले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे कार्य केले. मराठी नौसेनेचे संस्थापक म्हणूनही त्यांचे कार्य महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ राजाचे जीवन नसून एक विचार आहे. हा विचार शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास श्री.शाह यांनी व्यक्त केला.
शिवशाहीर बाबासाहेबांनी 50 वर्ष शिवसृष्टीचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले. पहिला टप्पा पूर्ण होत असताना बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचविलेला अजरामर विचार पुढे नेऊन संपूर्ण शिवसृष्टी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे. शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन सर्व मदत करेल. शिवाजी महाराजांचा वारसा, त्यांचे व्यवस्थापन शास्त्र, पर्यावरण दृष्टी, जलनियोजन पुढील पिढीपर्यंत पेाहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
प्रास्ताविकात विश्वस्त श्री.कदम यांनी शिवसृष्टी प्रकल्पाविषयी माहिती दिली. शिवसृष्टी प्रकल्पाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन धोरण 2016 अंतर्गत ‘मेगा टुरिझम प्रोजेक्ट’ म्हणून मान्यता मिळाली. पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारा सरकारवाडा
शिवसृष्टी हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्पा असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येईल.
सरकारवाडा मधील ‘दुर्गवैभव’ विभागात आजच्या तरुण पिढीला आपला जाज्वल्य इतिहास तितक्याच प्रभावीपणे समजावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मॅपिंग केलेले असून यासाठी होलोग्राफी, ॲनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, 3 डी प्रोजेक्शन, मॅपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
No comments