केंद्रीय जलसंपदा मंत्री करणार निरा देवघर प्रकल्पाची हवाई पाहणी - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - निरा - देवघर सिंचन प्रकल्प व कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हवाई पाहणी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार उद्या सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत सकाळी ८.३० वाजता पुण्यातून हेलिकॉप्टरने येत आहेत. हेलिकॉप्टर मधूनच ते निरा देवघर सिंचन प्रकल्प व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसह माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्याची पाहणी करणार असल्याची माहिती खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने निरा - देवधर या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद केलेली आहे व प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. केंद्र सरकारने निरा - देवघर साठी निधी द्यावा व आपण प्रत्यक्ष या प्रकल्पाची हवाई पाहणी करावी. कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प कृष्णा लवादाच्या अंतर्गत काही तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला आहे. यावरही केंद्रीय मंत्री यांनी मार्ग काढावा. हवाई पाहणी करून पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला पाणी मिळून हा संपूर्ण परिसर ओलिताखाली येईल. त्याचबरोबर माढा मतदार संघातील दुष्काळी भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटेल अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी,केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली होती.
No comments