हत्ती लहानाचा मोठा मी केला आणि 'हे' नीरा देवघरचे श्रेय घेऊ लागलेत ; खासदारांना स्वतःच्या मतदारसंघात टिमकी वाजवायची आहे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज जे गावागावात पाणी पोहोचले आहे, त्याचे श्रेय विरोधकांकडून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. नीरा देवघर प्रकल्प, धोम - बलकवडी प्रकल्प तयार करताना, ज्या भागात उपमुख्यमंत्र्यांना देखील जाऊ दिले जात नव्हते, त्या खोऱ्यात मी स्वतः जाऊन, लोकांची मनधरणी करून, त्यांच्याकडून या प्रकल्पासाठी जमिनी संपादन केल्या आहेत, हत्ती (प्रकल्प) लहानाचा मोठा मी केला, आणि आता हे नीरा देवघर धरणाचे श्रेय घेऊ लागलेत, नीरा देवघर धारणाविषयी चुकीची वक्तव्य विरोधकांकडून होत आहे. ३१ मे २००० नंतर कृष्णा खोऱ्यातील पाणी नव्याने अडवू शकत नव्हतो, शिवसेना भाजप सरकारच्या वेळी कृष्णा खोऱ्याचे काम आम्ही करत होतो, कृष्णा खोरे महामंडळ अंतर्गत अनेक प्रकल्प तयार केले. नीरा देवघर, धोम बलकवडी, तारळी, जिहे कठापूर, उरमोडी, टेम्भू ही सर्व धरणे त्यावेळी प्रत्यक्षात नव्हती, फक्त नारळ फुटले होते, त्या काळात सर्व खोऱ्यामधून प्रत्येक माणसाकडे जाऊन मी जमिनी संपादन केलेल्या आहेत, धरणे कोठे बसवायची ते इंजिनिअर सोबत मी, पायी जाऊन, त्या त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे, त्यावेळी कृष्णा महामंडळाला जर १६०० कोटी रुपये निधी मिळाला नसता व प्रकल्पग्रस्तांनी साथ दिली नसती तर ही धरणे झाली नसती. त्यावेळी साताराचे आमदार छत्रपती अभयसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर व मी प्रकल्पग्रस्तांकडे जाऊन बसत होतो, त्यामुळे धरणे प्रत्यक्षात आली, आज विरोधक म्हणतात पाणी मी आणलं.. पाणी मी आणलं... पण उरमोडी, तारळी धरण झाले नसते तर माण खटावला पाणी आले असते का? धोम बलकवडी, नीरा देवघर झाले नसते तर फलटण,खंडाळा तालुक्यात पाणी आले असते का ? असा सवाल करून, हे सर्व खोलवर सांगण्याचे कारण म्हणजे सध्या विरोधकांकडून श्रेयवादाचे चुकीचे राजकारण चालू असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाठार निंबाळकर ता.फलटण येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, सरपंच सौ.सुवर्णाताई नाळे, नंदकुमार नाळे, राजीव नाईक निंबाळकर, संदीप निंबाळकर, रमेश उराडे, अभिजित निंबाळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी तसेच फलटण तालुक्यातील इतर मान्यवर उपस्थित होते.
खासदारांना नीरा देवघरचे पाणी सांगोला, करमाळा, पंढरपूर भागास द्यायचे आहे, पाणी देण्याच्या विरोधात आम्ही नाही, परंतु निरा देवघर धरणाचे खरे लाभार्थी हे खंडाळा, फलटण व माळशिरस हे तालुके आहेत, पाणी या तीन तालुक्यांना दिले गेले पाहिजे आणि गरज असेल तर मग पुढचा विचार झाला पाहिजे, तुम्हाला तुमच्या मतदारसंघात पुढे पाणी द्यायचे असेल तर, जास्त पाणी आणून द्यावे, परंतु या तालुक्यांची तहान न भागवता ते पाणी पुढे द्यायचे, हे चुकीचे धोरण आहे, आमच्या वाट्याचे पाणी काढायचं आणि स्वतःच्या मतदारसंघात टिमकी वाजवायची, आम्ही हे चालू देणार नाही, हे पाणी निरा देवघर धरणाच्या लाभक्षेत्रात म्हणजे खंडाळा फलटण, कोरेगाव, माळशिरस इथे दिले गेले पाहिजे, अन्यथा या धोरणाच्या विरोधात वेळप्रसंगी मोर्चे काढावे लागतील असा इशारा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
सध्या फलटणमध्ये चुकीचे राजकारण चालू आहे, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात, कायद्याचा धाक दाखवला जातोय, उचलून नेले जातेय, धमक्याचे राजकारण जर वाढत गेले तर याचे परिणाम पुढील पिढीवर वाईट होणार आहेत. या सर्वापासून पुढील पिढीला वाचवावे लागेल, यासाठी न घाबरता, जो विकास फलटणचा झालाय त्याचा हिशोब मांडून, भविष्यात योग्य वाटचाल करणाऱ्या, जाणकार नेतृत्वालाच संधी द्यावी लागणार आहे, यासाठी राष्ट्रवादी शिवाय आपल्याला पर्याय नसल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.
शेतीविषयक मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, आपल्याला आता कापूस पीक घ्यावे लागणार आहे ,आपल्या भागात पूर्वी कापूस भरपूर प्रमाणात येत होता, आता पाणी आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस लागवड करावी, त्याचबरोबर फळबाग लागवड देखील शेतकऱ्यांनी करावी. सध्या ग्लोबल वार्मिंग मुळे तिन्ही हंगामावर परिणाम होत आहे, त्यामुळे वृक्ष लागवडीकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले.
यावेळी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, महेंद्र खरात, राहुल कांबळे, राजीव नाईक निंबाळकर यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले. प्रास्तविक नेताजीराव निंबाळकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत सरपंच सौ.सुवर्णाताई नाळे, नंदकुमार नाळे व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.
No comments