Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती : चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's 132nd birth anniversary: Care should be taken that there is no shortage of facilities at Chaityabhoomi - Chief Minister Eknath Shinde

    मुंबई, दि. २७: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

    यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते.

    डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. यंदा बाबासाहेबांची १३२ वी जयंती असून त्यासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही यासाठी महापालिका, पोलिस यांनी विशेष खबरदारी घ्यावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ही जयंती होत असून त्याला वेगळे महत्त्व असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    समन्वय समितीमार्फत ज्या सूचना आणि मागणी करण्यात आली आहे त्याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते जयंती दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. मुंबई महापालिकेमार्फत जयंती दिनी करण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

No comments