Breaking News

विडणी सोसायटी निवडणुकीसाठी २७ उमेदवार रिंगणात

27 candidates in the fray for Vidni Society elections

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीसाठी १३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. एका जागेचा अपवाद वगळता ही निवडणुक दुरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

   विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही फलटण तालुक्यातील  कोट्यावधी रुपायांची उलाढाल असलेली सर्वात मोठी सोसायटी आहे. या सोसायटीच्या निवडणुकीसाठी ५९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल  झाले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३२ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता १३ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एक अपक्ष उमेदवार सोडला तर अन्य बारा जागांसाठी दुरंगी लढत होणार आहे.

   या निवडणुकीत भाजप(शिवसेना) शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे. सोसायटीचे एकूण २१२१ सभासद आहेत. परंतू थकीबाकीमुळे २१४ सभासद अपात्र ठरले असल्याने १९०७ सभासदांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. शनिवारी दि.१८ मार्च रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी त्याच ठिकाणी मतमोजणी होउन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

        दरम्यान फलटण तालुक्यातील अन्य आठ सोसायटीचांही निवडणुक कार्यक्रम लागला असला तरी राजुरी, सासवड, मठाचीवाडी व फरांदवाडी येथील सोसायटींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, तर गोखळी, कुरवली खुर्द, पवारवाडी व विडणी या चार सोसायटीच्या निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सुनिल धायगुडे यांनी दिली आहे.

    नुकत्याच पार पडलेल्या विडणी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जादा सदस्य निवडून आले असले तरी भाजपचे उमेदवार जनतेतुन सरपंच म्हणून निवडून आले आहेत. 

    या सोसायटीवर आजवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली असली तरी ही निवडणूक प्रचंड चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप येथे सत्ताबदल करण्यात यशस्वी ठरणार का याकडे अनेकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

No comments