मलठण मध्ये तुंबळ हाणामारी ; कुऱ्हाड, चाकू, तलवार व गावठी कट्ट्याचा वापर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि ९ : मलठण, फलटण येथील गोसावी गल्ली येथे, दोन गटात झालेल्या भांडणाचे पर्यावसन तुंबळ हाणामारी व तुफान दगडफेकीत झाले. या वेळी कुऱ्हाड, चाकू, तलवार व गावठी कट्ट्याचा वापर करण्यात आला. यावेळी गाड्यांचीही तोडफोड झाल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी झाल्या असून, दोन्ही गटातील एकोणीस जणांसह अन्य अनोळखी पंचवीस संशयीतांवर आर्म ॲक्टसह अन्य कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवार दि. ७ मार्च रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोसावी गल्ली येथे मागील भांडणाच्या कारणावरुन सनी माणिक जाधव, रोहित राजू जाधव, मुकेश माणिक जाधव, अनिकेत बनसोडे, दिगंबर जाधव, अर्जुन राजु जाधव, आकाश सावंत, आशा संजय जाधव, चांदणी मुकेश जाधव, रुपाली ( पुर्ण नाव माहित नाही ), अभिषेक ( इल्ला ) यांच्यासह अन्य दहा ते पंधरा लोकांनी सर्व रा. इंदिरानगर झोपडपट्टी, मलटण, फलटण यांनी आपसी संगनमत करुन जमावाने येवून आमच्या घरात घुसुन घरातील लोकांना व घराबाहेरील नातेवाईकांना हातातील तलवार, लोखंडी पाईप, कुर्हाड, चाकुसह हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व गावठी कट्ट्याने धमकावीले. तसेच दुचाकी व चारचाकी गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले. या मारहाणीत फिर्यादी सचिन चव्हाण, रोहित बाळू घाडगे, पिंटू जयसिंग चव्हाण, मंगल मोहन घाडगे हे जखमी झाले असल्याची फिर्याद सचिन सुभाष चव्हाण वय २९ रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ गोसावी गल्ली, मलटण यांनी दिली आहे.
दुसर्या फिर्यादीत मंगळवार दि. ७ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विकी उत्तम चव्हाण, बाळू सर्जेराव घाडगे, सुनिल सर्जेराव घाडगे, सचिन चव्हाण, संजु जाधव, माया घाडगे, नंदा घाडगे व अन्य आनोळखी आठ ते दहा जण घरात आले. त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी पाईप, दगड होते. त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. यात मुकेश जाधव यांच्या हातावर वार झाल्याने गंभीर जखम झाली. तसेच भावजय आशा, बहिण रुपाली, मुलगा विश्वजीत हेही जखमी झाले असल्याची फिर्याद मुकेश माणिक जाधव वय ४० रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ गोसावी गल्ली, मलटण यांनी दिली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास अनुक्रमे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणव केनेकर व पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम हे करीत आहेत.
सदर भांडणानंतर तुफान दगडफेक झाल्याने मलठण येथुन जाणारा मुख्य रस्ता जवळपास अर्ध्या तासापेक्षाही जास्तवेळ बंद होता. या भांडणात महिलांनीही नंग्या तलवारी नाचविल्याचे बोलले जात असुन या घटनेने या परीसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एवढा मोठ्ठा गुन्हा दाखल होवूनही फलटण शहर पोलिस ठाणे व अधिकार्याकडून याघटनेबाबतची माहिती पत्रकारांना देण्याचे टाळण्यात आले.
No comments