निरा-देवघरच्या ३९७६.८३ कोटी निधी प्रशासकीय मान्यतेचा जीआर प्रसिद्ध - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि ९ : निरा-देवघर पाटबंधारे प्रकल्पास राज्य शासनाने ३९७६.८३ कोटी या किमतीस प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय करून तसा जीआर आज प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
नीरा-देवघर धरण हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देवघर गावाजवळ नीरा नदीवरील सुरुवातीचे मोठे धरण आहे. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र कृष्णा खोऱ्यामध्ये आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळा अंतर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये आहे. या धरणाचा एकुण साठा १२.९८ अ.घ.फु इतका आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा १५८ किलोमीटर लांबीचा व डावा कालवा १८ किलोमीटर लांबीचा आहे. नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्यांमुळे भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ११८६० हेक्टर फलटण तालुक्यातील१३५५० हेक्टर व माळशिरस तालुक्यातील १०९७९ असे एकूण ४००५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याशिविय सांगोला व पंढरपुर तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारकडून हा प्रकल्प होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले गेले. आजपर्यंत अनेक तालुक्यातील दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केले होते, परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करून नीरा-देवघर प्रकल्पाची बंद पडलेली फाईल सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढे नेली. या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प होणे खूप गरजेचे आहे यासाठी राज्यस्तरावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबत त्यांच्या दालनामध्ये सचिव व अधिकारी यांची बैठक घेऊन यास मंजुरी घेतली व कालच याबाबतचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. आता लवकरच निविदा निघणार आहेत व काम सुरू होईल असा विश्वास खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला आहे.
No comments