एसटी व कारची समोरासमोर धडक ; १ ठार तर ९ जखमी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरदजवळ एसटी बस व कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात १ ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. कमल भीमराव यलपले (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमीत कार मधील 3 जण व एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आज शनिवार दि. २५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर गुणवरेहून फलटणच्या दिशेने निघालेली एसटी (एमएच १४ बीटी १२६७) आणि फलटणहून सांगोलाच्या दिशेने चाललेली कार (एमएच १२ डीवाय १५०२) यांची पिंपरद गावच्या हद्दीत राजीव दीक्षित व्यसनमुक्ती केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली. यात एक ठार तर नऊ जण जखमी झाले.
या अपघातात कार चालक मोहन भीमराव यलपल्ले, पुतण्या सोयम यलपले, मुलगा वरद यलपले (सर्व रा. यल्लमड मंगेवाडी, ता. सांगोला) हे कारमधील जखमी झाले. तर एसटीमधील स्वाती बंडू खोमणे (१७, रा. निंबळक), दयानंद सीताराम गावडे (१९, रा. गुणवरे), श्रध्दा सूर्यकात दळवी (१७), आकांशा बापू चव्हाण (१७, दोघी रा. शेरे शिंदेवाडी), पूजा बिपिन निंबाळकर (१७, रा. निंबळक ) व महिला वाहक आश्विनी जयराम गोसावी हे जखमी झाले आहेत.
या अपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कार चालक मोहन भीमराव यलपले व एसटीचालक शरद वडगावे यांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे तपास करीत आहेत.
No comments