राजुरी येथे १ लाख ४० हजार रुपयांची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ - राजुरी ता. फलटण येथे उघड्या असणाऱ्या घरात प्रवेश करून घरातील १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना घडली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे राजुरी तालुका फलटण गावचे हद्दीत, दि.२६ मार्च २०२३ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद शंकर पिसाळ यांच्या पिसाळ मळा येथील उघड्या असणाऱ्या घरात, अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून, लेंग्याच्या खिशातील ४० हजार रुपये व सुटकेस मधील १ लाख रुपये असे एकूण १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम, चोरून नेली आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास पिसाळ यांच्या घराची लाईट गेल्याने त्यांना जाग आली, त्यानंतर दोघे जण इसम त्यांच्या जवळ उभे असल्याचे त्यांना दिसले, त्यावेळी त्यानी त्यांचा नातू आला असावा म्हणून, आवाज दिला. त्यावेळी ते दोघे घरातून निघून गेले, त्यानंतर पिसाळ त्यांच्या पाठीमागे घराच्या बाहेर गेले असता, ते दोघे पळून जात असताना त्यांनी पाहिले. त्यांनतर पिसाळ घरात आल्यावर, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेल त्यांना दिसले. व घरात ठेवलेली रक्कम चोरट्यांनी चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले असल्याची फिर्याद प्रल्हाद शंकर पिसाळ वय ७५ वर्षे रा. पिसाळ मळा राजुरी ता. फलटण यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक काशीद हे करीत आहेत.
No comments