खा. रणजितसिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पालखी महामार्गाची हवाई पाहणी
केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांच्यासमवेत हवाई पाहणी करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १२ : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी खा. रणजितसिंह यांच्यासह फलटण तालुक्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरीडॉर मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली. पाहणी नंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
वारकरी सांप्रदाय व कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या आळंदी व पंढरपूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित मार्गाची हवाई पाहणी करण्याची मागणी केली होती, ती मंत्री गडकरी यांनी आज मान्य केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - ९६५) हा २३४ किमी लांबीचा महामार्ग असून तो हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी मार्गे पंढरपूर असा आहे. या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखीमार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे या मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल व वारकऱ्यांना वारी दरम्यान या सुविधांचा फायदा होईल. पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनऔषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या हवाई पाहणीमध्ये गडकरी यांनी खा. रणजितसिंह यांच्यासमवेत हवाई पाहणी करताना पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, माळशिरससह नवीन पुणे बेंगलोर महामार्गाचीही पाहणी केली. यादरम्यान खा. रणजितसिंह यांनी या अनुषंगाने फलटण मार्गे जाणारा तसेच फलटण शहरातील पालखी महामार्ग, शहराबाहेरील रिंग रोड तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या विनंतीवरून खटाव तालुक्यात हायवेवर विमान उतरविनेसह अन्य आवश्यक मागण्या केल्या असल्याची माहिती खा. निंबाळकर यांच्या विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे.
No comments