Breaking News

फलटण तालुक्यात अवकाळी पाऊस : ३ ठिकाणी वीज पडली

सांगवी येथे झाडावर वीज पडल्याने जळालेली झाडे
Unseasonal rain in Phaltan taluk: Lightning struck at 3 places

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. १६ : फलटण शहर आणि तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने गेल्या २ दिवसांपासून दमदार सुरुवात केली असून तालुक्यात ३ ठिकाणी वीज पडल्याने नुकसान झाले आहे, पण जीवीत हानी नाही. साथ रोग प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

    तालुक्याच्या पूर्व भागात आसू, गुणवरे, गोखळी, दुधेबावी त्याचप्रमाणे सासवड, साखरवाडी वगैरे भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. फलटण शहरात बारीक पाऊस गेले २/३ दिवस सायंकाळी होत आहे. मात्र कोठेही जोराचा पाऊस झाला नाही त्यामुळेच चिंता वाढली आहे. बारीक रीमझिम पावसाने शेतातील उभी पिके विशेषतः टोमॅटो, भाजीपाला, फळबागा यांचे नुकसान होत आहे तर काढणीच्या स्थितीत उभ्या असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    बारीक पावसाने वातावरणात गारठा निर्माण होत असून हवामान दूषित होत असल्याने सर्दी, पडसे, खोकला यासारखे आजार वाढत असताना नव्याने दाखल झालेला विषाणू जन्य आजार या हवामानामुळे आपल्याकडे तर येणार नाही ना अशी भिती व्यक्त होत आहे. त्यातच सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने प्रा. आरोग्य केंद्रात केवळ डॉक्टर उपलब्ध असल्याने गर्दी वाढल्यास नवी समस्या निर्माण होण्याचा धोका पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण झाला आहे.

    दरम्यान गेल्या २ दिवसांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु असल्याने अधिक पावसाची शक्यता व्यक्त होत असताना ७ सर्कल साखरवाडी आणि सांगवी येथे झाडावर वीज कोसळल्याने झाडे जळून खाक झाली आहेत. जावली येथे वैरणीच्या गंजीवर वीज पडल्याने संपूर्ण वैरण जळून गेली असून सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

No comments