शरद पवार यांच्याकडून फलटण येथे डाळिंब बागेची पाहणी
![]() |
वाठार निंबाळकर येथे बागेची पाहणी करताना शरद पवार सोबत सुभाषराव शिंदे व अन्य मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, झालेल्या घडामोडींना पूर्णविराम देत, पुन्हा अध्यक्षपद स्वीकारुन, काही घडलेच नसल्याच्या भूमिकेत खा. शरद पवार यांनी आपल्या शेती व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या कामाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. तापमान ४० अंशावर पोहोचले असताना भर दुपारी ३ वाजता वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील चंद्रकांत अहिरेकर यांच्या डाळिंब बागेला भेट देत, संपूर्ण बागेची, तेथील डाळिंब फळांची पायी फिरुन पाहणी करून, माहिती घेतली.
चंद्रकांत अहिरेकर या चौधरवाडी, ता. फलटण येथील बागायती पट्ट्यातील शेतकऱ्याने वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील जिरायती पट्ट्यात माळरानावर शेती घेऊन मेहनत, मशागतीद्वारे फुलविलेली डाळिंब बाग, त्यामधील दर्जेदार डाळिंब उत्पादन याची माहिती मिळाल्यानंतर खा. शरद पवार यांनी त्यांच्या डाळिंब बागेला अचानक सदिच्छा भेट देवून चंद्रकांत अहिरेकर व कुटुंबीयांचे कौतुक केले, त्यांच्याकडून माहिती घेत मार्गदर्शन केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी अध्यक्ष विश्वासराव तथा नानजी देवकाते, बारामतीचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, उत्तमराव चौधरी, माजी संचालक हणमंतराव चौधरी, बाजार समितीचे संचालक चेतन शिंदे आदींसह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.
या देशातील उत्पादित शेतमालाला चांगली बाजार पेठ मिळाली पाहिजे, अधिक शेती उत्पादन कसे निघेल आणि येथील शेतकरी समाधानी कसा राहील याचाच विचार खा. शरद पवार यांनी नेहमी केला असल्याचे आज वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील डाळिंब बागेला भेट देवून तेथील समस्या जाणून घेत केलेल्या मार्गदर्शनातून स्पष्ट झाले आहे.
नाशिक भागात द्राक्ष बागा वाढत असताना तेथील शेतकऱ्यांनी अन्य राज्यातील किंबहुना इंगल्ड व अन्य देशातील द्राक्ष बागांची माहिती घेऊन येथील द्राक्ष उत्पादनात सुधारणा घडविल्याचे निदर्शनास आणून देत आता इराण मध्ये डाळिंब उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने आपण चंद्रकांत अहिरेकर सह अन्य शेतकऱ्यांना तेथील डाळिंब बागांची पाहणी करण्यासाठी इराण पा असल्याचे सांगताना तेथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी सुसंवाद करुन संपूर्ण डाळिंब उत्पादन प्रक्रियेची माहिती घेण्याची सूचना त्यांना करणार असून द्राक्ष बागांप्रमाणे येथील डाळिंब उत्पादनात सुधारणा करुन डाळिंब उत्पादक शेतकरी चिंता मुक्त, सुखी समाधानी कसा होईल यासाठी आपला प्रयत्न असल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.
प. महाराष्ट्र नंतर आता बुलढाणा, जालना जिल्ह्यात काही प्रमाणात डाळिंब उत्पादन सुरु झाले आहे मात्र प. महाराष्ट्रात डाळिंबाचे क्षेत्र कमी होत आहे. तेल्या किंवा अन्य रोग टाळण्यासाठी दोन झाडामधील स्वच्छता महत्त्वाची आहे. बागा स्वच्छ असतील तर तेल्या किंवा अन्य कीड रोग कमी होत असल्याचे सांगताना येथील ३०० ग्रॅम किंवा त्यापेक्षा मोठ्या डाळिंब फळाला चीन मध्ये मागणी असते तसेच युरोप, ऑस्ट्रेलिया, बांगला देश, दुबई वगैरे देशात येथील डाळिंब निर्यात होत असून निर्यात क्षम फळ पाठविल्यानंतर उर्वरित फळे येथील बाजारात विकली जात असल्याचे खा. शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले. इराण मध्ये डाळिंब क्षेत्र वाढत असल्याने तेथील माहिती घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खा. शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान गेले २/३ दिवस आपल्या राजीनाम्याने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला होता याची कोठेही चर्चा होऊ न देता संपूर्ण भेटीत डाळिंब बागेची पाहणी, त्याबाबत माहिती व मार्गदर्शन या पलीकडे खा. शरद पवार यांनी एक शब्द न उच्चारता आपले शेती व शेतकऱ्यांवरील प्रेम, त्यांच्या विषयी असलेली आस्था, आपुलकी दाखवून देत त्यापुढे पक्षीय राजकारण, सत्ता नगण्य असल्याचे न बोलता दाखवून दिल्याची चर्चा त्यांच्या भेटी नंतर उपस्थितांमध्ये सुरु होती.
No comments