Breaking News

अधिकाऱ्यांनी कोणत्याही पुढाऱ्याच्या घरी जाऊ नये ; सर्वसामान्यांसाठी काम करावे - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Officers should not go to the house of any leader; Work for common people - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ -   काही शासनाचे अधिकारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले आहेत. अधिकाऱ्यांनी कोणत्याही पुढाऱ्याच्या घरी जाऊ नये,  अधिकाऱ्यांनी आपण शासनाच्या नोकरीला आहोत हे लक्षात ठेवावे, कुठल्याही पुढाऱ्याकडे नोकरीला असल्यासारखे वागू नये.  यापुढे सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू मानून अधिकारी वर्गाने कामकाज करावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे आपण स्वतः लक्ष देणार असल्याचा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शासकीय अधिकारी - कर्मचारी यांना दिला. 

    फलटण येथील दरबार हॉल येथे आयोजित आढावा बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव,  दादासाहेब दराडे, गटविकास अधिकारी  सौ. अमिता गावडे यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

    पुढे बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले, नागरिकांची शासन दरबारी असणारी कामे  किंवा  महसूल संदर्भात असणारी कामे करून घेताना, नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. या कामांच्या बदल्यात काही ठिकाणी पैसे मागितले जातात, घरकुलास सरकारी जमिनीवर बांधकाम करण्यास परवानगी दिली जात आहे,  गाड्या - मोटारी असणाऱ्यांना घरकुल दिली गेली आहेत, आणि खरी आवश्यकता असणाऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे.  परंतु आता बस झाले, झाले गेले ते गंगेला मिळाले, इथून पुढे जर असे काही झाले, तर त्याच्या नोकरीवर गदा  येईल असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शासकीय अधिकारी - कर्मचारी यांना दिला. 

    यावेळी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या विविध अडचणींबाबत खासदार रणजितसिंह यांनी आढावा घेऊन, त्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी करून त्या दूर करण्याच्या सूचना दिल्या.

No comments