Breaking News

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार करताना सुनिल धायगुडे त्यावेळी विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, चेतन शिंदे व संचालक (छाया- योगायोग फोटो)
Shrimant Raghunathraje Naik Nimbalkar as Chairman of Agricultural Produce Market Committee

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी भगवानराव होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेअरमन पदी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची निवड जाहिर होताच, शहरात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.   

भगवानराव होळकर यांचा सत्कार करताना सुनिल धायगुडे त्यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेतन शिंदे व संचालक

          फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये निवडणूक निर्णय आधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सरकारी संस्था, फलटण सुनिल धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता या निवडी पार पडल्या. चेअरमन पदासाठी रघुनाथराजे व व्हा. चेअरमन पदासाठी होळकर यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले. 

        यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नुतन संचालक चेतन शिंदे, निलेश कापसे, तुळशीदास शिंदे, संतोष जगताप, दीपक गौंड, शंभूराज पाटील, शरद लोखंडे, ज्ञानदेव गावडे, भीमराव खताळ, अक्षय गायकवाड, सौ. सुनीता रणवरे, सौ. जयश्री सस्ते, किरण शिंदे, चांगदेव खरात, संजय कदम, समर जाधव यांची उपस्थिती होती.

        नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत राजे गटाने सर्वच्या सर्व १८ जागांवर बहुमताने विजय मिळवून विरोधकांना व्हाईट वॉश दिला होता. श्रीमंत रघुनाथराजे यांनी कल्पकतेने कार्यान्वित केलेल्या विविध योजनांमुळे या कृषी बाजार समितीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली होती. त्याचबरोबर शेतकरी, हमाल मापाडी यांच्यासाठी देखील विविध योजना सुरू होत आहेत.  त्यामुळे  श्रीमंत रघुनाथराजे हेच पुन्हा चेअरमन होणार हे नक्की होते. पुढिल पाच वर्षाच्या कालावधीत बाजार समिती अधिक सक्षम करण्याचे आपले उद्दीष्ट्य असल्याचे सांगत प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत बाजार समितीच्या नावास साजेसे काम प्रशासक सुनिल धायगुडे यांनी केल्याचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

    यावेळी नुतन संचालकांचा चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी आभार सचिव शंकर सोनवलकर यांनी मानले. 

No comments