पाणीप्रश्नी श्रीमंत रामराजे यांच्या कार्याची नोंद इतिहासात कायम राहील - अजितदादा पवार ; आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करावे लागणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांचे संकेत
![]() |
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभीष्टचिंतन करताना आ.अजितदादा पवार, आ.जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील व इतर मान्यवर (छाया- योगायोग फोटो) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० - धोम बलकवडी, निरा - देवधर धरणाच्या बाबतीत श्रीमंत रामराजेंचे मोठे योगदान आहे. ते कदापी विसरता येणार नाही, याची कायम इतिहासामध्ये नोंद राहणार असल्याचे सांगतानाच, रामराजेंना लोकसभेत पाठवावे या, जयंत पाटील यांच्या सूचनेला अनुमोदन देऊन, रामराजे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न करावे लागणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी केले.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त फलटण येथे अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. सुनील भुसारा, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, डी. के. पवार, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, बंटीराजे खर्डेकर, शिवरुपराजे खर्डेकर, सत्यजीतसिंह पाटणकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, चेतन शिंदे उपस्थित होते.
फलटणच्या राजघराण्याचे समाजकारण, राजकारणात मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाकरता श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी योगदान दिले आहे. त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. श्रीमंत रामराजे आमदार झाले आणि फलटण तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. १९९५ च्या निवडणूकीत श्रीमंत रामराजे यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी या परिसरातील अपक्ष आमदारांना एकत्र केले. या सर्वांचे नेतृत्व रामराजेंनी केले. त्यावेळी जे आमदार अपक्ष आले होते, त्या सर्वांनी पाण्यासाठी रामराजे यांची साथ दिली. त्यांना मंत्रिपद मिळू शकली असती, परंतु त्यांनी पाणी व विकास कामांना प्राथमिकता दिली. त्यावेळी अपक्ष आमदारांनी, सध्याच्या आमदारांसारखे, ५० खोके एकदम ओके' असे म्हटले नाही. त्यावेळी श्रीमंत रामराजे यांनी कृष्णा खोरे महामंडळ अस्तित्वात आणा असे म्हणत, २२ अपक्ष आमदारांसह तत्कालीन सरकारला पाठिंबा दिला, अशा प्रकारची किमया या २२ लोकांनी केली आणि त्याचे नेतृत्व श्रीमंत रामराजे यांनी केले म्हणूनच धोम - बलकवडी धरण झाले, निरा - देवघर धरण झाले, जिहे कठापूर - तारळी, उरमोडी अशी कितीतरी धरणे झाली असल्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्याचे नेतृत्व श्रीमंत रामराजे यांच्याकडे दिल्यानंतर श्रीमंत रामराजेंनी सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय केला. धोम बलकवडी, निरा - देवधर धरणाच्या बाबतीत श्रीमंत रामराजेंचे मोठे योगदान आहे. ते कदापी विसरता येणार नाही, याची कायम इतिहासामध्ये नोंद राहणार आहे. रामराजे यांनी या धारणांसाठी रात्री एकेक, दोन- दोन वाजेपर्यंत काम केलेले आहे. पुनर्वसन करताना जनतेशी संवाद साधून, त्यांचे पुनर्वसन करणे अशी कामे रामराजेंनी केली आहेत. कृष्णा खोऱ्यातील पाणी बोगद्याद्वारे भिमा खोऱ्यात आणण्याचे काम झाले आहे. लोकांच्या मध्ये इच्छाशक्ती असेल आणि नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असेल तर काय घडू शकते हे आपण पाहिले आहे. मात्र आताचे राज्यकर्ते या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. राष्ट्रीय नेत्यांच्यावर बेताल वक्तव्य करण्याचे काम महाराष्ट्रात घडतंय. सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत. याचीही नोंद जनतेने घेतली पाहिजे. कारण महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. मे महिन्यामध्ये गारपीट होते, पाऊस पडतोय हे आपण कधी पूर्वी पाहिले आहे का? आशा प्रकारची संकटे ग्लोबल वार्मिंग मुळे वाढली आहेत. ग्लोबल वार्मिंग संकटामुळे संपूर्ण वातावरण बदलले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम करण्यासाठी, धमक आणि ताकत असणारीच माणसं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असणे गरजेचे आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
श्रीमंत रामराजे यांच्या बद्दल मनामध्ये एक आदर आहे, सन्मान आहे, रामराजे यांनी चार दशके संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे त्यांच्याबद्दल आदर अधिक वाढला आहे. विधानपरिषद अस्तित्वात आल्यापासून ज्या सभापतींच्या शब्दाला संपूर्ण विधान परिषद ऐकण्याचे काम करते, त्यांचा शब्द अंतिम मानते, असे जे सभापती होते, त्यांच्यामध्ये श्रीमंत रामराजे साहेब यांचा क्रमांक फार वरचा लागतो असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत श्रीमंत रामराजे सभापती तर विधानसभेत जावई राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले. हे देशात एकमेव उदाहरण आहे. हे सर्व रामराजे यांच्या कामामुळे, नेतृत्वामुळे व फलटणकरांच्या पाठिंब्यामुळे, घडले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामराजेंना लोकसभेत पाठवण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागतील अशी सूचना मांडली, या सूचनेला मी अनुमोदन देतो. कारण श्रीमंत रामराजे यांनी नगराध्यक्ष पद भूषवले, विधानसभा पाहिली, विधान परिषद पहिली, जिल्हा परिषदेला मार्गदर्शन केले, जिल्हा बँकेला मार्गदर्शन केले, बाकीच्या सर्व संस्थांना ते मार्गदर्शन करतायेत, विधान परिषदेचे सभापती पद भूषवले आहे. त्याच्यानंतर आता लोकसभा पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे रामराजे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न करावे लागणार असल्याचे प्रतिपादन अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले, आजपर्यंतच्या इतिहासात दुष्काळी पट्ट्याची सर्वाधिक सेवा रामराजे यांनी केली आहे. त्याचा मी साक्षीदार आहे. १९९१ साली रामराजे नगराध्यक्ष झाले १९९५ साली विधानसभेत गेले. त्यावेळी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ४५ अपक्ष आमदार निवडून आले. आपल्या भागातील अपक्ष आमदारांना एकत्र करून, त्या आमदारांना घेऊन, तत्कालीन सरकारला कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करायला लावली. फलटणच्याच व्यासपीठावरून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली. कृष्णा खोऱ्याची जबाबदारी रामराजेंवर येताच, राजेंनी कल्पकतेने योजना काढल्या, बोगद्याद्वारे पाणी या भागात आणले, त्यांनी अनेक योजना मार्गी लावल्या. योजना मार्गी लागल्या नसत्या तर खटाव तालुक्याला पाणी मिळालेच नसते. दुष्काळी भागाचा खरा भगिरथ रामराजे आहेत. फलटण, खंडाळा, खटाव, माण या तालुक्यांसाठी रामराजेंनी केलेले काम जलसंपदा विभागाच्या इतिहासामध्ये लिहले पाहिजे. महाबळेश्वर जवळील सोळशी धरणाची कल्पनादेखील रामराजेंची आहे. एक सक्षम नेता रामराजेंच्या रुपाने सर्वांना मिळाला आहे. राजघराण्यातील असूनही त्यांनी राजेशाही कधी दाखवली नाही.
श्रीमंत रामराजेंच्या रुपाने फलटण व सातारा जिल्ह्याला एक वेगळं नेतृत्व मिळाले आहे. रामराजेंनी आपलं नेतृत्व दिल्लीत जावून करावे. महाराष्ट्र सरकारकडून जेवढं आणायचे आहे, तेवढं रामराजेंनी आणले आहे. आता केंद्र सरकारकडून जे शिल्लक राहिले आहे ते आणण्यासाठी रामराजेंना आता आपणाला दिल्लीला पाठवायचे आहे. त्यांच्या मनात असो अगर नसो, पण आता त्यांना दिल्लीला जावेच लागेल. एका चांगल्या नेतृत्वाला देशपातळीवर काम करण्याची संधी देखील शरद पवारसाहेब, अजितदादा आणि या भागातील सर्वजण नक्कीच देतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्या भाषणात म्हणाले, पाण्यासाठी व दुष्काळी जनतेच्या विकासासाठी कायम आग्रही राहिलो. पाण्यासाठी एक दृष्टीकोन ठेवून काम केले. युतीच्या काळात १ किंवा दोन आमदार असले तरी मंत्रिपदे मिळत होती. मात्र, पाणी अडवणे व धरण बांधणे किती गरजेचे आहे हे माझ्यासह २२ आमदारांना त्यावेळी समजले होते. ते आमदारही दुष्काळी भागातील असल्याने आम्ही एकत्र आलो. मंत्रिपद न मागता कृष्णा खोरे महामंडळ मागितले. त्यावेळी नेमकी गरज काय आहे हे ओळखून आम्ही काम केले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, खा. शरद पवार कृषी मंत्री असताना तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशी बैठक केल्यानेच निधी मिळाला. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील धरणे झाली. कृष्णा खोऱ्याच्या पाण्यावर लवाद बसला असता तर सातारा जिल्ह्याचे पाणी गेले असते. हे पाणी जावू नये यासाठी प्रयत्न केले. त्याला शरद पवार, अजितदादा व जयंत पाटील यांनी मोठी मदत केली. त्यामुळेच साताऱ्याचे पाणी गेले तर नाहीच, महाराष्ट्राला ८१ टीएमसी पाणी अधिकचे मिळाले आहे, हे सर्व तुम्ही सर्वांनी साथ दिल्यानेच हे घडू शकले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, श्रीमंत शिवाजीराजे यांनी सत्तास्थाने ताब्यात नसताना १९९१ मध्ये मला, संजीवराजे व रघुनाथराजेंना एकत्र आणले व राजकारण व समाजकारणाची सुरुवात झाली. त्यांनतर अविरत मेहनत घेऊन मतदार संघाच्या विकासकामांना प्राधान्य दिले. फलटण खंडाळा, माण, खटाव सारख्या दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न मिटवला. फलटण, लोणंद, खंडाळा येथे औद्योगिक वसाहती निर्माण केल्या, आता शेतीचा, उद्योगाचा प्रश्न मिटला, परंतु आजच्या जगात युवकांपुढे नवीन संकट निर्माण झाले आहे, त्याला शेती करायची नाही, त्याला आयटी क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यामुळे आपल्याला बदलत्या क्षेत्रात व आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करावे लागणार असल्याचे संकेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. पुढची पिढी आयटी व आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सक्षम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जगापुढे निर्माण झाला आहे, त्या दृष्टीने कामकाज करावे लागणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक आ. दिपकराव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचलन सुधीर गाडगीळ यांनी केले. सुभाष शिंदे यांनी आभार मानले.
No comments