'मोदी @ ९' : २३ वर्ष प्रलंबित रेल्वेप्रश्न खा.रणजितसिंह यांनी सोडवला - अमर साबळे ; खा.रणजितसिंह यांची पत्रकार परिषद धावत्या रेल्वेत !
पत्रकार परिषद बोलताना सातारा जिल्हा प्रभारी माजी खासदार अमर साबळे समवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (छाया - अमित फोटो) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - मोदी सरकारची ९ वर्षे अर्थात मोदी @ ९ या अभियाना अंतर्गत १४ विषय घेतलेले आहेत त्यापैकी एक विषय आहे विकास तीर्थ. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये लोककल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी जे जे विकासाचे प्रोजेक्ट लोकार्पण झालेले आहेत, त्यापैकी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण - लोणंद ही रेल्वे २३ वर्षानंतर चालू झालेली आहे. २३ वर्षापासून फलटण तालुका विकासापासून वंचित होता, परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकुशल खासदार लाभल्यानंतर काय विकास होऊ शकतो त्याची एक झलक, फलटण लोणंद रेल्वे ट्रॅक चालू करून आपल्याला पाहायला मिळाली असल्याचे माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितले.
९ वर्ष भारतीय जनता पार्टीची, ९ वर्षे मोदी सरकारची, 'मोदी @ ९' या अभियानांतर्गत भाजपाच्या वतीने देशभरात झालेल्या विकासकामांची पाहणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने भाजपाचे सातारा जिल्हा प्रभारी माजी खासदार अमर साबळे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत फलटण ते लोणंद या रेल्वेप्रवासात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, प्रदेश सदस्य जयकुमार शिंदे, फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष नरसिंग निकम, फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
'मोदी @ ९' या काळामध्ये २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यापूर्वी देशाला दिलेली, सर्व अभिवचने, या सरकारने पूर्ण केलेली आहेत, आयोध्यातील प्रभू रामचंद्राचे मंदिर उभारण्याचा विषय असू द्या किंवा कलम ३७० चा विषय असू द्या किंवा या देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा झालेला विकास आणि या विकासामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदीजींची वाढलेली लोकप्रियता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण जगामध्ये उंचावलेली भारताची प्रतिष्ठा, हे पाहता २०१४ साली दिलेली आश्वासने, 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे पंतप्रधानांनी या ९ वर्षांमध्ये विकासाचा प्रचंड डोंगर उभा केला आहे, आणि आता २०२४ च्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत, यापूर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून हा देश विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये आत्मसन्मानाने उभा आहे. या पद्धतीने विकासाचा आराखडा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार होतोय आणि त्या सर्व आराखड्याला आणि मोदीजींच्या सर्व संकल्पनांना माढा मतदारसंघाचे खासदार साथ देत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन माजी खासदार अमर साबळे यांनी केले.
भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांनी सांगितले होतं की, केंद्रातून विकासासाठी एक रुपया पाठवला जातो, त्यातील ८५ पैसे हे दलाल खाऊन टाकतात आणि १५ पैसे फक्त लोकांच्या हातामध्ये मिळतात, परंतु नरेंद्र मोदीजींनी विकासाचा प्रकल्प अशा पद्धतीने राबवला आहे की, जर दिल्लीमधून एक रुपया पाठवला तर तो गोरगरिबांच्या कल्याणासाठी किंवा जो प्रोजेक्ट योजला आहे, त्या प्रोजेक्टसाठी खर्च होताना दिसतोय, याचा अर्थ असा की, ८५ पैशाची दलाली बंद केल्यामुळे, या देशाची भरभराट, प्रगती चालू आहे, परंतु या दलाली मध्ये अडकलेले विरोधी पक्षाचे नेते यांची दलाली बंद झाल्यामुळे, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक फार मोठे कटकारस्थान राबवले जात आहे, एकमेकांच्या विरोधातील विचारधारा असताना देखील एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट करत आहेत, यालाच सामोरे जाण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभरामध्ये या 'मोदी @ ९' या अभियाना अंतर्गत १४ विषयांच्या माध्यमातून नागरिकांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा आणि विकासाचा जो आराखडा आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितले.
खा.रणजितसिंह यांची पत्रकार परिषद धावत्या रेल्वेत!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने जी विकासाची कामे देशभरात झाली आहेत त्याची पाहणी, त्याची उजळणी करण्याचे काम सर्व देशात चालू असून, फलटणचा २३ वर्षापासून प्रलंबित रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळेच ही चालती - बोलती प्रेस कॉन्फरन्स रेल्वेमध्ये घेतली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
No comments