Breaking News

आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माणचा दुष्काळ दूर होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Andhli Upsa Sanchan Yojana will eliminate the drought of Man - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    सातारा  - गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे – कठापूर) अंतर्गत  आंधळी उपसा सिंचन योजना व आंधळी थेट गुरूत्वीय नलिकेच्या कामाचे  भूमिपूजन होत असून ही एक आनंदाची गोष्ट आहे. यामुळे माण तालुक्याचा दुष्काळी भाग सिंचनाखाली येणार असून येथील दुष्काळ कायमचा दूर होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    या भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. तु. धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.

    या दुष्काळी भागाचा कायापालट होण्यासाठी आंधळी सिंचन योजनेचे काम खासदार नाईक निंबाळकर व आमदार श्री.गोरे यांच्या प्रयत्नांमुळे व पुढाकारांमुळे होत असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. काम करीत असताना गुणवत्ताही चांगली ठेवावी. सिंचनाची सोय झाल्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन नक्की होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

    एकूण 1 हजार 330 कोटी 74 लाख रुपयांच्या या योजनेतील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वितरण प्रणालीद्वारे 18 हजार 970 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेचा प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून या योजनेसाठी 247 कोटी 34 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.

    या प्रकल्पाअंतर्गत कृष्णा नदीतून खरीप हंगामात 3.17 अ.घ.फु. पाणी उचलून सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खटाव व माण तालुक्यातील एकूण 27,500 हे. क्षेत्र सिंचनाखाली आणणे नियोजित आहे. कृष्णा नदीवर कठापूर, ता. कोरेगाव येथे बॅरेज बांधून तीन टप्प्यात 209.84 मी. उंचीवर पाणी उचलून खटाव तालुक्यातील नेर धरणात सोडण्यात येणार आहे. नेर तलावातून सोडलेले पाणी येरळा नदीत सोडण्यात येणार आहे. नेर तलावातून 12.746 कि. मी. लांबीच्या आंधळी बोगद्याद्वारे पाणी माण तालुक्यातील आंधळी धरण व माण नदीत सोडण्यात येणार आहे. प्रकल्पात येरळा नदीवरील 15 व माण नदीवरील 17 को.प. बंधाऱ्यांचा समावेश आहे. प्रकल्पामध्ये नेर उपसा सिंचन योजना 1 व 2, आंधळी उपसा सिंचन योजना यांचा समावेश आहे. योजनेच्या एकूण लाभक्षेत्रापैकी (27,500 हे.) बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे 18,970 हे. तर को. प. बंधाऱ्यावरील खाजगी उपसाद्वारे 8,530  हे. सिंचन करण्याचे प्रस्तावित आहे.

No comments