'आरोग्य वारी' : पालखी मार्गावर महिलांसाठी आरोग्य व सुरक्षा सुविधा - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
फलटण येथील कार्यक्रमात बोलताना ना. सौ. रुपाली चाकणकर (छाया : कवितके फोटो फलटण). |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ जून - पुणे, सातारा, सोलापूर हे भाग्यवान जिल्हे असून जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे या जिल्ह्यातून मार्गक्रमण करतात, त्यामध्ये सहभागी लक्षावधी वारकरी, दिंडीकरी, भाविकांसाठी विविध सोयी सुविधा आपण देत आलो आहोत, तथापि त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी असणाऱ्या स्त्रियांचा विचार यापूर्वी कधी झाला नसल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून गतवर्षी पासून आपण आरोग्य वारी उपक्रमांद्वारे वारीतील महिलांसाठी हिरकणी कक्षाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी पाळणा, खेळणी, स्तनदा मातांसाठी बाळाला दूध पाजण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे, वारी दरम्यान मासिक पाळीला सामोरे जावे लागले तर सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्याबरोबर वापरलेले सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी खास मशिनद्वारे ते नष्ट करण्याची व्यवस्था करण्यात येत असून महिला वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अडचणीच्या काळात १०९१ क्रमांकावर संपर्क केल्यास तातडीने पोलिस संरक्षण, पालखी तळावर आणि परिसरात महिलांसाठी स्वच्छता गृह आणि स्नान गृहांची स्वतंत्र व्यवस्था, वैद्यकिय उपचारांची गरज असेल तर त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पुरेशी औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार असून सोहळ्यातील महिलांनी या सर्व सुविधांचा वापर करावा, आरोग्य वारी या उपक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत असुन ही 'आरोग्य वारी' महिलांची वाटचाल सुखद करेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.
महिला सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करताना ना. सौ. रुपाली चाकणकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर |
आषाढी वारी दरम्यान देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी सोहळ्यातील महिला वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र महिला आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य वारी उपक्रमाचा शुभारंभ आणि महिलांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा महाराजा मंगल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ना. सौ. रुपाली चाकणकर बोलत होत्या, यावेळी आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, स्वयंसिद्धा महिला संस्था समुहाच्या प्रमुख अड. सौ. मधुबाला भोसले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. रेश्मा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले, वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार फलटण समीर यादव, तहसीलदार खंडाळा अजित पाटील सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) सौ. रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी सातारा दीपक ढेपे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा) सौ. क्रांती बोराटे, प्रभारी गट विकास अधिकारी फलटण सतीश कुंभार, गटविकास अधिकारी फलटण, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. रेश्मा देशमुख, सौ. राजश्री शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, विविध महिला मंडल पदाधिकारी, ग्रामपंचायत महिला सरपंच, सदस्या यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी असणाऱ्या महिलांना आरोग्य व सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा प्राधान्याने मिळाल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून गतवर्षी पासून आषाढी वारी दरम्यान आरोग्य वारी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा ना. सौ. रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिले.
हिरकणी कक्षाचा शुभारंभ करताना ना. सौ. रुपाली चाकणकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
या उपक्रमांतर्गत सँनिटरी नॅपकिन वैंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निग मशीन, स्त्री रोगतज्ञ, चेंजिंग रुम, सर्व दर्शनी भागात महिला सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक, दर १० किलोमीटर अंतरावर विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तसेच निर्भया पथक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे ना. सौ. चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिले. व सातारा जिल्ह्यामध्ये 'आरोग्य दूत' या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या रंगाच्या टू व्हिलर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. असा अनोखा उपक्रम राबवुन तो यशस्वी केल्याबद्दल सातारकरांचे मनापासुन कौतुक व अभिनंदन केले.
कोरोना काळामध्ये फलटण तालुक्यातील आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जे काम केले ते विसरता येणार नाही असे सांगून कोरोना सारख्या अत्यंत कठीण परिस्थितीत या सर्व भगिनी प्रत्येक घरामध्ये जावून सर्वांची विचारपूस करत आपली सेवा बजावत होत्या असे गौरवोद्गार व्यक्त करीत आता आषाढी वारीमध्ये त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी त्या निश्चित उत्तम पद्धतीने पार पाडतील असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
महिला अयोग्याच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आरोग्य वारी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून याचा फायदा वारीमधील महिला वारकरी भगीनींना होणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
आ. दीपक चव्हाण म्हणाले, गेल्या वर्षी पासून आरोग्य वारी हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ना. सौ. रुपाली चाकणकर राबवत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्या पासून राज्य महिला आयोग एवढ्या ताकदीने काम करु शकतो याची माहिती सर्वांना झाली आहे. यापूर्वी सुद्धा महिला आयोग राज्यामध्ये कार्यरत होता, परंतू नक्की कोणत्या पद्धतीचे काम सदर आयोगाच्या माध्यमातून सुरु होते हे कोणालाही समजले नाही मात्र आता ना. सौ. रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या कार्यकक्षा, अधिकार, महिलांसाठी विविध उपक्रम राबवून निदर्शनास आणून दिले आहेत. महिला आयोग्याच्या माध्यमातून आरोग्य वारी उपक्रम हाती घेण्यात आला आहे तो अतिशय स्तुत्य आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, महिला बालविकास विभागाच्या ढवळे मॅडम, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आषाढी वारी सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असताना वारकरी, दिंडीकरी, भाविक यांच्यासाठी विशेषतः महिलांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या विविध सेवा सुविधांचा आढावा सादर करताना महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
No comments