Breaking News

फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

Bhoomipujan of new buildings of Phaltan City, Phaltan Rural and Vathar Police Station by Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    सातारा  :-  फलटण तालुक्यात आज माऊलीच्या पालखी आगमनाच्या पवित्र दिवशी तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे ही मोठी आनंदाची बाब आहे. तालुक्यात होत असलेल्या या नवीन पोलीस ठाणे इमारतीमधून तक्रारदाराला मैत्रीची वागणूक मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व  कल्याण महामंडळामार्फत सातारा जिल्ह्यात फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या आधुनिक पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे भुमिपूजन ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

    पोलीस दुरक्षेत्र बरड ता.फलटण येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अधीक्षक अभियंता अलकनंदा माने यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व नागरीक उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलिसांना  चांगली घरे मिळावीत ही राज्य शासनाची भूमिका आहे. यासाठी राज्य शासनाने पोलीस हौसिंगच्या कामाला प्राधान्य दिले असून या कामासाठी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात अपराध सिद्धीचा दर वाढत असून तो ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.  अपराध सिद्धी दर वाढल्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण होण्यास मदत होईल आणि यातून कायद्याचे राज्य प्रस्तापित होईल.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील रस्ते, सिंचन प्रकल्प, रेल्वे यासह अन्य योजना व  विकास कामांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.  राज्य शासन सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून विकासाचे निर्णय घेत आहे. वारकऱ्यांसाठी यंदा शासनाने विमा योजना आणून  वारकऱ्यांप्रती राज्य शासनाने आपले उत्तरदायित्व निभावले आहे. या योजनेमुळे वारकरी समाधानी दिसत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोलिसाना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास. त्यांच्याकडून चांगले काम होते.  सातारा जिल्ह्यात पोलीस  विभागामार्फत महिला सुरक्षा संदर्भात चांगला उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील ढेबेवाडी, औंध मसूर यासह अन्य 13 गृहनिर्माण  प्रकल्प प्रलंबित आहेत, त्यास गृह विभागाने निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मंजूर करावेत.

राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील रस्ते, सिंचन प्रकल्प, रेल्वे यासह अन्य विकास योजनांना गती देऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या या तीन पोलीस ठाण्यांसाठी राज्य शासनाने 13 कोटी 64 लाखाचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येकी 850 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दुमजली पोलीस ठाणे, कायदा सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास सज्ज होतील. या पोलीस ठाण्यामुळे सुमारे तीन लाख 70 हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 18 महिन्यांच्या कालावधीत या तीनही पोलीस ठाण्यांची उभारणी होणार असून,अंतर्गत डांबरी रस्ता – संरक्षक भिंत-भूमिगत पाण्याची टाकी – रेन वॉटर हार्वेस्टिंग- पथदिवे – अंतर्गत आणि बाह्य सोलर प्रणाली-  अग्निशमन प्रणाली- जनरेटर सेट- सेफ्टी टँक- ट्रान्सफॉर्मर यासह परिषद हॉल, मीटिंग हॉल, रेकॉर्ड खोली, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, स्वतंत्र लॉक अप, दिव्यांग प्रसाधनगृह, शस्त्रागार खोली, वायरलेस ऑफिस, पासपोर्ट ऑफिसचा या नव्या आधुनिक इमारतीमध्ये समावेश आहे,अशी माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.

कार्यक्रमात फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार या तीन नूतन पोलीस ठाणे  इमारत बांधकाम संदर्भात तयार करण्यात आलेली चित्रफित दाखविण्यात आली.

No comments