श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने फलटण पालखीतळाची स्वच्छता
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ जून - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढीवारी दरम्यान बुधवार दि. २१ जून रोजी एकदिवसाच्या मुक्कामासाठी फलटण विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर विसावला होता. पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर विमानतळ व परिसरात झालेल्या अस्वच्छतेमुळे संपूर्ण वातावरण दुषीत होण्याचा धोका लक्षात घेवून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने आज शुक्रवार दि. २३ जून रोजी सकाळी शेकडो हात विमानतळावरील स्वच्छतेच्या कामास लागले आणि काही तासात संपूर्ण परिसर स्वच्छ होवून मोठ्या प्रमाणावर कचरा नगर परिषद कचरा डेपोवर पाठविण्यात आला.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने फलटण नगर परिषद फलटण, फलटण एज्युकेशन सोसायटी तसेच फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व फलटण शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत सालाबाद प्रमाणे पालखी तळ ( विमानतळ) स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील माउलींच्या रथापुढे २७ आणि रथामागे असणाऱ्या २०० हून अधिक दिंड्यामध्ये सुमारे सव्वा ते दिड लाख वारकरी असून त्याशिवाय अन्य दिंड्यातून चालणारे वारकरी आणि भाविकांची संख्या सुमारे तेवढीच आहे त्याशिवाय माउलींच्या दर्शनासाठी फलटण व परिसरातून येणारे भाविक असा सुमारे ३ ते ४ लाख लोकांचा राबता एक दिवसभर शहरात राहिल्याने शहरातील आरोग्य, पाणी, वीज, सुरक्षा आदी सर्वच यंत्रणावर प्रचंड ताण येत असतो. त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता शहराच्या आरोग्याला बाधा पोहोचविणारी ठरत असल्याने, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर गेल्या १२ वर्षापासून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाल्यानंतर शहर व पालखी तळावरील स्वच्छतेसाठी खास मोहिम आखून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहरातील स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, तरुण मंडळे, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांना करतात त्यांच्या आवाहनानुसार ही सर्व मंडळी या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
या स्वच्छता अभियानामध्ये या स्वच्छता मोहिमेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पांडुरंग गुंजवटे, तेजसिंह भोसले, सनी अहिवळे, महादेव माने, अमरसिंह खानविलकर, राहुल निंबाळकर, भाऊ कापसे, महेंद्र जाधव, ऍड. नेवसे यांच्यासह फलटण नगर परिषद, फलटण एज्युकेशन सोसायटी, मुधोजी महाविद्यालय फलटण, मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कुल शिक्षण संस्था मधील शिक्षक, विद्यार्थी - विद्यार्थिनी, लायन्स क्लब फलटण व फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
No comments