फलटण तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करणार - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ - फलटण तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन, जे काय सर्वात बेस्ट असेल ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न माझा निश्चित असेल. यासाठी श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे हे देखील अग्रेसर आहेत, कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठीच आजची बैठक बोलवली असून, शेतकऱ्यांनी आपले विचार, सूचना इथे मांडाव्यात असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्याच्या पूर्व भागात कापूस खरेदीचे नियोजन करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, विविध कार्यकारी सह. सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत गुरुवार दि.०८.०६.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता दक्षिणमुखी हनुमान मंदिर, गोखळी येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व खटकेवस्तीचे विकासरत्न सरपंच बापूराव गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोजतात्या गावडे, विश्वासबापू गावडे, धनंजय पवार, शिवाजीराव लंगुटे, बाजार समिती संचालक ज्ञानदेव गावडे, संजय कदम, अक्षय गायकवाड, दीपक गौंड, शंभुराज पाटील, टी. डी. शिंदे, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत रघुनाथराजे म्हणाले, कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करतोय. पूर्व भागात जिनिंग सुरू करण्यासाठी शिवरूपराजे यांनी चंग बांधला आहे. या भागातून कापसाचे उत्पादन जास्त येत होते, त्यावेळी तालुक्यातील बागायतदाराला एक वेगळे स्थान होते, एक वेगळा रुबाब होता, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे मोठे बागायतदार म्हणून शेतकरी गणले जायचे. या काळात कापसाच्या व ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी भरपूर पैसा कमावला होता. त्यामुळे माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे की, या भागात पुन्हा एकदा कापसाचे पिक व्हावे व पूर्व भाग पुन्हा त्याच रुबाबात यावा. पूर्व भागातील बागायतदार तसेच रुबाबात यावेत अशी अपेक्षा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले की, या भागात पूर्वी कापूस हेच मोठे पीक होते. या भागात कापूस इतका उत्पादित होत होता, की आम्ही त्याला पांढरे सोने म्हणायचो. परंतु मधल्या काळात कापसावर रोग आला व त्यामध्ये कापूस नामशेष झाला होता. पुन्हा एकदा पवारवाडी, गोखळी, आसू या भागात कापसाचे पीक वाढू लागले आहे, कापसाची लागवड करण्यात आली आहे. कापूस खरेदी केंद्रासाठी आसू हे योग्य ठिकाणी आहे. फलटण हे पूर्व भागातील शेतकऱ्यांना लांब पडेल, आसू येथे जिनिंगचा सेटअप तयार आहे, जागा तयार आहे, फक्त मशनरी बदलावी लागेल, तरी जिनिंग आसू येथे सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवरूपराजे खर्डेकर यांनी केली.
या भागातील कापसाचे उत्पादन चांगले असून, त्याचा दर्जा देखील चांगला आहे. कापसाची स्ट्रेंथ चांगली आहे. या भागात जिनिंग सुरू झाली तर पूर्व भागातील शेतीचा पॅटर्न बदलेल, शेतकऱ्यांची ३० टक्के इकॉनॉमिक ग्रोथ होईल. जूनमध्ये कापसाची लागवड होऊन ऑक्टोबर डिसेंबरमध्ये कापूस पीक काढल्यानंतर शेतकरी दुसरं पीक घेऊ शकतो. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आम्हाला सहकार्य पाहिजे. आसू येथील जिनिंगची मशिनरीची पाहणी करून त्यामध्ये आधुनिक बदल करावा व या सीझनमध्ये आता जास्त चर्चा न करता ॲक्शन मोडवर येऊन जिनिंग सुरू करण्यात यावी असे शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले.
कापूस खरेदी केंद्राचे नियोजन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अडीअडचणी, सूचना सांगून, कापूस खरेदी केंद्र लवकर सुरू करावे अशी मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजीबापू गावडे यांनी केले.
No comments