मुस्लिम समुदायाचा बकरी ईद कुर्बानी 30 रोजी करण्याचा निर्णय,निर्णयाचे सर्वत्र स्वागत
पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी करणार नसल्याचे पत्र देताना मुस्लिम बांधव |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - जगभरात येत्या २९ जूनला बकरी ईद साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही आल्याने, या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता, एकादशीनंतर दिनांक ३० रोजी सण साजरा करण्याचा निर्णय फलटण शहर आणि तालुक्यातील मुस्लीम समुदायाच्या बहुतांश लोकांनी घेतला असून, राज्यात सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आपापल्या हद्दीतील मुस्लिम समुदायातील मान्यवर तसेच विविध मशिदीचे प्रमुख यांच्याशी दिनांक २९ रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली असता मुस्लिम समुदायाने सकारात्मकता दाखवून आषाढी एकादशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी ऐक्याच्या दिशेने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आहे. एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे. दिनांक 29 रोजी मुस्लिम समाज केवळ नमाज पठण करणार असून ज्यांच्या कुर्बाणी असतील ते 30 रोजी करणार आहेत या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत सर्वांनी फलटण तालुक्याला ऐतिहासिक परंपरा असून सर्व समाजामध्ये प्रेमाचे व एकतेचे वातावरण आहे हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज नेहमी सर्व सण उत्साहात साजरे करत असतो त्यामुळे एकादशी दिवशी बकऱ्याची कुरबानी न करता इतर दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्रही पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना देण्यात आले पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनीही मुस्लिम समुदायाच्या निर्णयाचे कौतुक केले
No comments