मुख्य पालखीच्या पाठीमागूनच दिंड्या मार्गक्रमण करतील - राधाकृष्ण विखे पाटील ; महसूल मंत्र्यांकडून फलटण पालखी तळाची पाहणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ जून - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य पालखी पुढे गेल्यानंतर दिंड्या पाठीमागून जातील. पालखीच्या पुढे चालणाऱ्या दिंड्यांनी देखील मुख्य पालखीच्या पाठीमागूनच जावे असे परिपत्रक काढण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन पालखी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळा आषाढी वारी दरम्यान सोहोळा दि. १८ ते २२ जून दरम्यान सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याच्या पार्श्वभूमीवर आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फलटण येथे पालखी तळाची पाहणी केली. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार समीर यादव, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये नोंदणीकृत दिंड्यांसोबतच नोंदणी न केलेल्या दिंड्यांची संख्या ही मोठी असते. त्या दिंड्यांची नोंदणी करण्यात यावी. पालखी सोहळ्यात मुख्य पालखी गेल्यानंतरच उर्वरित दिंड्यांनी मार्गक्रमण करावे, त्यामुळे मुख्य पालखी मार्गक्रमण करताना त्या परिसरात स्वच्छता राहील. त्यासाठी शासनाने एक परिपत्रक प्रसिद्ध करावे अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
No comments