खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने ९ ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकामांची स्थगिती रद्द
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेतून फलटण तालुक्यातील ९ ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी मंजूर झालेल्या १ कोटी ४४ लाख रुपये खर्चाच्या मंजुरीची स्थगिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली असून सदर १ कोटी ४४ लाख रुपये खर्चाच्या इमारती उभारणीचा मार्ग खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने खुला झाला आहे.
मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेतून सातारा जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जुलै २०२२ मध्ये एकूण ५ कोटी ३४ लाख रुपये मंजूर झाल्याचे सातारा जिल्हा परिषदेने या सर्व ग्रामपंचायतींना कळविले होते. त्यानंतर सदर मंजूर बांधकामांना स्थगिती देण्यात आल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये त्याबाबत चर्चा सुरु होती.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही बाब दि. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्राद्वारे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत आपल्या माढा मतदार संघातील ९ ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणी वरील स्थगिती आदेश मागे घेऊन कामे सुरु करण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्र्यांनी सदर स्थगिती आदेश रद्द केल्याचे सातारा जिल्हा परिषदेस कळविल्यानंतर सातारा जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) अर्चना वाघमळे यांनी दि. २९ मे च्या पत्राने सदर स्थगिती आदेश रद्द झाल्याचे फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना कळविले असून सदर ग्रामपंचायतींना कामे सुरु करण्याबाबत प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आले असून या ९ ग्रामपंचायतींबाबत कामे सुरु होण्याच्या दृष्टीने पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश गटविकास अधिकारी फलटण यांना दिले आहेत.
सदर ९ ग्रामपंचायती मध्ये घाडगेवाडी, बोडकेवाडी, कांबळेश्वर, ताथवडा, राजाळे, निंभोरे, टाकळवाडा, शेरेचीवाडी (ढवळ), मानेवाडी या ९ ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यापैकी बोडकेवाडी, मानेवाडी आणि शेरेचीवाडी (ढवळ) या ३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १२ लाख आणि उर्वरित ६ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये बोडकेवाडी, मानेवाडी आणि शेरेचीवाडी (ढवळ) या ३ ग्रामपंचायतींना १० %, घाडगेवाडी, ताथवडा आणि टाकळवाडा यांना १५ % तर कांबळेश्वर, राजाळे, निंभोरे यांना २० % लोकवर्गणी भरावी लागणार आहे.
No comments