पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आढावा
सातारा-दि.15- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून 18 जून ते 23 जून या कालावधीत मार्गक्रम करणार आहे. या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला तयारीचा आढावा.
लोणंद ता. खंडाळा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकरची संख्या वाढवावी अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्या ठिकाणावरून पाणी टँकर मध्ये भरले जाणार आहे त्याची पाहणी करावी. आरोग्य विभागाने जास्तीत जास्त पदके हे फिरते ठेवावे म्हणजे तात्काळ कोणत्याही वारकऱ्यांला आरोग्य सुविधा पुरवता येतील. पालखी सोहळ्यासाठी जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा. यासाठी शेजारील जिल्ह्यांची मदत घ्यावी. प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्यात येणार आहेत त्याचे जागोजागी फलक लावावे. तसेच पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छतेला जास्त महत्त्व द्यावे अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या.
यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणावरून पाणी टँकरमध्ये भरण्यात येणार आहे ते पाणी स्वच्छ करण्यासाठी पथके तैनात करण्यात आले आहेत. पुरेश्याप्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दिंडी प्रमुखांची संपर्क साधण्यासाठी समन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत काही अडचणी असतील त्या सोडवण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोहळ्यामध्ये सुसज्ज अशा रुग्णवाहिका ही तैनात ठेवण्यात येणार आहेत, असे सांगून पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी यावेळी सांगितले.
बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी निराघाट व लोणंद येथील पालखी तळाची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी वृक्षारोपण केले.
No comments