धार्मिक भावना दुखावतील असे मेसेज - फोटो - व्हिडीओ शेअर केल्यास गुन्हा दाखल होणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ जून - उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभागातर्फे फलटण शहरातील व विभागातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, मागील काही दिवसापासुन महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल, लोकांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचे फोटो, मॅसेज व व्हिडिओ हे सोशल मिडीयाव्दारे प्रकाशित झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तरी अशा प्रकारच्या घटना फलटण शहर व फलटण विभागात होऊ नये याकरिता फलटण पोलीस उपविभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, सोशल मिडीयावर कोणत्याही व्यक्तीने धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल, लोकांच्या धार्मिक व जातीय भावना दुखावतील अशा पद्धतीने फोटो, मॅसेज व व्हिडिओ सोशल मिडीयाव्दारे प्रसारीत करण्यात येऊ नये. अशा प्रकारचे फोटो, मॅसेज व व्हिडिओ प्रसारीत केल्यास पोलीस विभागातर्फे तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल असा गुन्हा सिद्ध झाल्यास भारतीय दंड संहिता कलम १५३(अ), २९५ (अ), ५०५ अन्वये तीन ते पाच वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
तरी फलटण शहरातील व विभागातील नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, सोशल मिडीयातून अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता व कोणतीही शहानिशा न करता धार्मिक व जातीय तेढ निर्माण होईल, लोकांच्या भावना दुखावतील असे मेसेज, फोटो व व्हिडीओ प्रसारीत अगर फॉरवर्ड, शेअर करू नये तसेच व्हॉटसअॅपचे ग्रुप अॅडमीन यांनी असे कोणतेही आक्षेपार्ह मेसेज, फोटो व व्हिडीओ प्रसारित होऊ देऊ नये यासाठी वेळीच प्रतिबंध करावा अन्यथा ग्रुपअॅडमीन यांचेवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी फलटण उपविभागातील नागरिकांनी समाजात जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहील यासाठी प्रयत्नशील व कटीबद्ध राहावे असे आवाहन करण्यात येते.
No comments