मोबाईल टॉयलेट मुळे वारीतील स्वच्छतेमध्ये भर- ज्ञानेश्वर खिलारी
सातारा (जि.मा.का.) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड मार्गे सोलापूर जिल्ह्यात जाते. पालखी मार्गावर उघड्यावरील हागणदारीस आळा बसावा यासाठी मोबाईल टॉयलेट, गाव स्तरावरील सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून दिली आहेत. शौचालयांचा मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांकडून वापर होताना दिसत आहे. यामुळे वारीतील स्वच्छतेमध्ये भर पडल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले.
वारकऱ्यांनी प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आलेले होते. यास ही वारकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. वारीमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचे प्रमाण कमी दिसत आहे. ग्रामपंचायतीने उभारलेल्या प्लास्टिक संकलन केंद्रात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या व इतर प्लास्टिक टाकले जात आहे. वारी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी स्नानगृहांची व्यवस्था केली आहे.
पाऊस लांबला असला तरी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित केला जात आहे. वारीमध्ये पंचायत समिती व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वयंसेवकांमार्फत वारकऱ्यांना घनकचरा व सांडपाणी निस्सारणाचे महत्व, पाण्याचा वापर, स्वच्छता सुविधांचा वापर याविषयी प्रबोधन केले जात आहे. यावर्षी स्वच्छता विभागाने वारकऱ्यांसाठी केळी वाटप व राजगिरा लाडू वाटप केले. सातारा जिल्ह्यातील स्वच्छता विषयक सोयी सुविधा व त्यांचे नियोजन उत्तम प्रकारचे केल्याने वारी आनंददायी झाली असल्याचे मत अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले.
चौकट- पालखी मार्गावरील सोयी सुविधासाठी सुक्ष्म नियोजन केले असून प्रत्येक विभागावर जबाबदारी निश्चित केली आहे. वारी स्वच्छ व आरोग्यदायी होणेसाठी जिल्हा परिषद प्रशासन कटीबद्ध आहे - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी.
No comments