पालखी सोहळा सुरक्षितरित्या मार्गक्रमण करून विठ्ठलाचे दर्शन घेईल - आय.जी. सुनील फुलारी ; पालखी सोहळा मार्ग, मुक्काम ठिकाणांची आय.जी. सुनील फुलारी यांच्याकडून पाहणी
पालखी सोहळा व्यवस्थापनाची माहिती घेताना आय.जी. सुनील फुलारी समवेत पोलीस अधीक्षक समीर शेख |
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, मुक्काम ठिकाणांची आय.जी. सुनील फुलारी यांच्याकडून पाहणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ जून - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गाची व पालखी मुक्काम तळांची पाहणी आज आम्ही केली असून, यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन यासंदर्भातील सर्व पूर्व तयारी झाली असून, आणखी काही कमतरता असतील तर त्या येणाऱ्या दिवसांमध्ये दूर केल्या जातील असे अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहोळा आषाढी वारी दरम्यान सोहोळा दि. १८ ते २२ जून दरम्यान सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक (आय.जी.) सुनील फुलारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणांची पाहणी केली. याप्रसंगी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर तिथून पुढे लोणंद येथे पालखीचा मुक्काम त्यानंतर तरडगाव पालखीतळ व फलटण पालखीतळ या ठिकाणची आम्ही पाहणी केली आहे. भाविकांची सुरक्षा, वाहतूक नियोजन, भुरट्या चोऱ्यांना प्रतिबंध, दळणवळण, बिनतारी संदेश यंत्रणा या सर्व बाबींची आम्ही पाहणी केलेली आहे, नियोजन व्यवस्थित झाले आहे. भाविकांचा हा सोहळा सुरक्षित रित्या मार्गक्रमण करून, पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेईल. त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जाईल, पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला जाईल, तसेच संपर्क साधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल नंबरही मार्गावर प्रसारित करण्यात येणार असल्याचे आय.जी. सुनील फुलारी यांनी सांगितले.
No comments