Breaking News

पुरोगामी, लोककल्याणकारी राजा : छत्रपती शाहू महाराज

Progressive, welfare king: Chhatrapati Shahu Maharaj

    आधुनिक महाराष्ट्र निर्माण करणारे कल्याणकारी राजे, शोषित, पीडित व पददलितांच्या कल्याणासाठी कार्य करणारे राजे छत्रपती शाहू महाराजांच् जयंतीनिमित्त विशेष लेख.....

    छ. शाहू महाराजांना अवघे ४८ वर्षांचे आयुष्य लाभले. आधुनिक महाराष्ट्राचे एक भाग्यविधाते म्हणून छ.शाहू महाराजांचे कार्य अलौकीक व असामान्य तसेच आहे. ते केवळ कोल्हापूरपुरते सीमित न राहता त्यांचे कल्याणकारी कार्य संपूर्ण देशभर लोकप्रिय झाले. त्यांनी शोषित, वंचित नाकारलेल्यांचा अस्पृश्यांचा कैवार घेऊन या उपेक्षित वर्गासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले व त्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक समता मिळवून दिली आणि अधिकाराचा विनियोग हा प्रमुख जनसामान्यांच्या कल्याणासाठीच केला. परंपरागत रूढी, अनिष्ट प्रथा व अंधश्रध्दांना बगल देऊन शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा नवा विचार त्यांनी समाजात रूढ केला. ज्या अस्पृश्यांना हीन वागविले जात असे, त्यांची सावलीदेखील अंगावर पडली म्हणजे विटाळ होत होता अशा अमानुष प्रथापरंपराचा त्या बुरसटलेल्या काळात गंगाराम कांबळे नावाच्या अस्पृश्य बांधवास चहाचे हॉटेल काढून दिले व स्वतः शाहू महाराज नित्यनियमाने चहा पिण्यास जाऊन मनुवादी वृत्तीच्या वर्ण- वर्ग व्यवस्थेविरुद्धचा लढा पुकारला व खऱ्या अर्थाने द्रष्टे राजे, कर्ते सुधारक ही शाहू महाराजांची ओळख केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला झाली. वस्तुतः राजवैभवामुळे मिळणारी सर्व सुखे, ऐषोरामी जीवनाला दूर करून लोककल्याणाचा वसा राजर्षीनी जोपासला.

    म. फुले यांच्या विद्रोही विचारातून बहुजनांची 'सत्यशोधक चळवळ उभी राहिली. संपूर्ण महाराष्ट्रात या चळवळीचा प्रसार झाला. अखेर ही चळवळ कोल्हापूरची केंद्रबिंदू ठरली. खऱ्या अर्थाने सत्यशोधक चळवळीस शाहू महाराजांचा आधार मिळाला व म. फुले यांची सत्यशोधक समाजाची ज्योत तेवत ठेवली. शाहू महाराजांनी सत्यशोधक विचारास जबरदस्त चालना देऊन म. फुलेंचे कार्य पूर्ण केले.

    वयाच्या २० व्या वर्षी शाहू महाराजांनी आपल्या हाती राज्यसूत्रे घेतली. त्यांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. परंतु, ज्या सुधारणा महाराष्ट्रात पुढे दोन-तीन पिढ्यानंतर झाल्या त्या सुधारणा त्यांनी आपल्या राजवटीतच प्रत्यक्षात कृतीत आणल्या. मानवी स्वातंत्र्याचे देणारी घोषणा. २) १९१७ पुनर्विवाहाचा कायदा, ३) १९१८ जाती जातीत विवाह करण्याचा कायदा. ४) आंतरजातीय विवाह कायद्यास पाठिंबा. ५) १९१२ ला सहकारी कायदा मंजूर केला. ६) १९१३ ला जहागीरदारांच्या बाबतीत ठराव करून त्यांनी सर्व इनामे अविभाज्य ठरविली. ७) १९१२ ला शिक्षण सक्तीने करण्याची घोषणा केली. ८) १९०२ ला अभूतपूर्व जाहीरनामा म्हणजे नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण मागासलेल्या वर्गासांठी जाहीर केले. शिक्षणाची बंद दारे खुली

    खऱ्या अर्थाने छ. शिवाजी महाराजांनंतर लोकाभिमुख, प्रजाहितदक्ष, बहुजनांच्या उन्नतीसाठी अविश्रांत झटणारे राजे छ. शाहू महाराज महाराष्ट्राला लाभले. अज्ञान, अंधश्रद्धा नि दारीद्रय हैं मानवाचे तीन महान शत्रू त्यांनी ओळखले. बहुजन समाजाच्या मागासलेपणास शिक्षणाचा अभाव असल्याचे त्यांनी जाणले आणि ज्ञानाची मंदिरे उभारून बहुजन समाजाला शिक्षणाची बंद दारे त्यांनी सताड उघडली. महाराजांचे शैक्षणिक कार्य सर्व महाराष्ट्रभर पसरले होते. त्यांनी नाशिक, पुणे, नगर इ. ठिकाणी शाळा, वसतिगृहे बांधली. शिक्षण संस्थांना सढळ हाताने सहकार्य केले. हे कार्य त्यांनी जातीनिरपेक्ष बुद्धीने केले. छ. शाहू महाराजांना सर्व जाती-धर्माचा उत्कर्ष साधायचा होता. शिक्षणामुळेच अंधश्रद्धा, विषमता नष्ट होऊ शकते, हे त्यांनी जाणले होते. सहकारी चळवळींना चालना

    छ. शाहू महाराज हे कामगार, शेतमजूर, शेतकरी यांच्याविषयी आस्था बाळगत त्यांनी विद्येचा प्रसार करण्याबरोबरच उद्योगधंद्याच्या वाढीसाठी प्रयत्न केले. सहकारीचळवळीला चालना दिली. म्हणून कोल्हापूर हे सहकारी क्षेत्रात अग्रेसर ठरले. सहकारी जीवनाचे यश शाहू महाराजांनी रुजविलेल्या सहकाराच्या समाज समतेच्या प्रेरणेत दिसून येते. ज्याप्रमाणे युरोपमध्ये मजूर पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले त्याप्रमाणे शाहू महाराजांनी कामगारांना मजूर संघ काढा, असे सांगितले. संघटनेविषयी विचार सांगणारा छ. शाहू महाराज हा भारतातील पहिला राजा म्हणावे लागेल. कामगारांचे, बहुजनांचे हाती सत्ता यावी हे त्यांचे स्वप्न होते.

    अस्पृश्यता निर्मूलनाबद्दल कळवळा : अस्पृश्यता निर्मूलनाच्या प्रश्नासंबंधी बोलताना १५ एप्रिल १९२० रोजी माणगाव येथील परिषदेत महाराज म्हणाले, की अस्पृश्यांना तुम्ही बेशरम आणि बेअब्रू केल्यामुळे त्यांची वृत्ती गुन्ह्याकडे होते. कित्येक लोक म्हणतात, राजकारणाचा आणि अस्पृश्यतेचा संबंध काय आहे? पण मी म्हणतो, अस्पृश्यांना माणसांप्रमाणे वागविल्याशिवाय राजकारण कसे होणार? मला समानता हवी, माणसामाणसात भेद नको, तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हाला नको हवेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील, असे पाहिजेत आणि त्या परिषदेत महाराजांनी अस्पृश्य समाजाला सांगितले, की तुमचे पुढारी डॉ. आंबेडकर आहेत. माझी खात्री आहे, की ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे.

    आज २१ व्या शतकाची पहाट उगवत असताना विज्ञानयुग येत असताना दलित, शोषित, उपेक्षित, वंचित समाजघटकांवर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अरिष्ट कोसळण्याचा धोका संभवत आहे. शिक्षणाचे बाजारीकरण या आधुनिक समस्येमुळे तरुणांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. मुले उच्च शिक्षणापासून वंचित होत आहेत, महागडे शिक्षण त्यांना परवडत नाही. आज राजकीय, सामाजिक समीकरणे बदलत आहेत. खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या धोरणांचा अवलंब केल्यामुळे बहुजनांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भ्रष्ट नेते व भ्रष्ट यंत्रणेमुळे तरुण चांगले संस्कार घडत नाहीत. आचार, विचार, संस्कार, सामाजिक भान इ. मूल्ये जाणीवपूर्वक पायदळी तुडविली जात आहेत. या सर्व बाजू लक्षात आणता फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी आज नव्याने करण्याची गरज आहे.
अशोक जानराव, माढा

No comments