आरोग्यदायी जिवनशैलीसाठी आहारात नियमित भरडधान्यांचा समावेश आवश्यक - खासदार श्रीनिवास पाटील
सातारा (जि.मा.का): आरोग्यदायी जिवनशैलीसाठी आहारात नियमित नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई यासारख्या भरडधान्याचा वापर करावा, त्यामुळे बीपी शुगर व कॅन्सर सारख्या आजारापासून मुक्ती मिळेल, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज येथे केले.
आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्ष 2023 निमित्ताने महाबळेश्वर पंचायत समितीच्या पार्किंगच्या जागेमध्ये आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, तहसीलदार तेजस्विनी पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरभळ, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश धापकेकर, संजू गायकवाड, तालुका कृषि अधिकारी नितीन पवार, कृषि अधिकारी चिरमे सहायक गट विकास अधिकारी सुनील पार्टे आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले, भरड धान्याची मोठ्या प्रमाणात लागवड व्हावी व त्याचा जास्तीत जास्त दैनंदिन अन्नात समावेश व्हावा यासाठी प्रोत्साहन म्हणून यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्ष म्हणून साजरे होत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी पारंपरिक व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेती करावी तसेच प्रत्येकाने किमान एक तरी झाड आपल्या घरासमोर लावावे. आपल्या लहान मुलांना आपली संस्कृती परंपरा अन्नपदार्थ यांच्याविषयी माहिती द्यावी, जेणेकरून आपली संस्कृती टिकून राहील.
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी म्हणाले, चित्र प्रदर्शनामध्ये भरड धान्य विषयी अत्यंत सोप्या भाषेत चित्रासह माहिती दिली आहे तसेच भरड धान्यापासून सकस अन्नपदार्थांचे प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्याचा केंद्रीय संचार ब्यूरो चा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री चव्हाण यांनी आयोजित प्रदर्शनाचे उद्देश व महत्त्व याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. टी. एम. आत्माचे संजय पार्टे यांनी केले आभार अंबादास यादव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून करण्यात आले यावेळी श्रीनाथ प्रतिष्ठान सातारा कलापथकाद्वारे जय जय महाराष्ट्र माझा आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडाचे सादरीकरण केले. सदर चित्र प्रदर्शनामध्ये तहसील कार्यालय कृषी विभाग पंचायत समिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, मध संचालनालय या विभागांचे शासकीय योजनांची माहिती देणारे दालन ठेवण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या पौष्टिक पाककृती स्पर्धेतील विजेत्या अंगणवाडी सेविकांना मान्यवरांचा हस्ते पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका स्नेहल गुप्ते, साधना वाघमळे, आर व्ही भणगे, केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालयाचे जे. एम. हन्नुरे, मंडळ कृषी अधिकारी भूपाल बुधावले, विस्तार अधिकारी अप्पा जाधव यांनी परिश्रम घेतले.
No comments