Breaking News

नीरा देवघरच्या बंद पडलेल्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लवकरच ; खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

The stalled work of Neera Deoghar will be inaugurated by Deputy Chief Minister soon - MP Ranjitsingh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ जून - खऱ्या अर्थाने फलटण तालुक्याला लाभ देणारी नीरा देवघरची जलसिंचन योजना वाघोशी गावाच्या पुढे बंद पडलेली आहे, इथे मला सांगायला आनंद होत आहे की, या कामाचे टेंडर ८ ते १० दिवसांमध्ये निघेल आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नीरा देवघर कॅनॉलच्या कामाचा शुभारंभ होईल. या निमित्ताने फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याचे भंगलेले स्वप्न पूर्ण होणार आहे आणि यामुळेच धोम बलकवडीचे चार माही पाणी आता बारमाही कडे जाणार आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या रखडलेला कामाचा शुभारंभ होत असल्यामुळे फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना अमृत संजीवनी मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार रणजीत निंबाळकर यांनी केले.

    निरा देवघर प्रकलाच्या कॅनॉल कामाची निविदा पुढील काही दिवसात निघत असून कामाचा प्रत्यक्ष शुभारंभही होणार आहे, या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघाचे  खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांसह नीरा देवघर प्रकलाच्या कॅनॉलचे काम ज्या ठिकाणी बंद पडले आहे, त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली व नागरिकांना निरादेवघर प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, प्रदेश सदस्य जयकुमार शिंदे, फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष ॲड. नरसिंग निकम, फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, वाघोशी गावचे सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते.

    वाघोशी गावात नीरा देवघरचे काम थांबले होते परंतु खासदारा रणजीतसिंह यांच्या प्रयत्नातून हे काम पुन्हा सुरू होत आहे, याच्या निविदा उद्या निघणार आहेत, आणि फलटण, खंडाळा, माळशिरस या तिन्ही तालुक्यात हे पाणी जाण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे.   २००० सालापासून नीरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे, परंतु केवळ आपल्या मंत्रिपदासाठी व लाल दिव्यासाठी फलटण तालुक्यातील नेत्यांनी हे तिन्ही तालुके बारामतीकडे गहाण ठेवले व निरा देवघरचे काम होऊ दिले नाही व नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवले. हे तीन तालुके कायमस्वरूपी दुष्काळात होरपळत होते आणि केवळ आपली राजकीय पोळी भाजावी, आपला लाल दिवा टिकावा म्हणून फलटण तालुक्यातील नेत्यांनी हे पाणी बारामतीकडे नेले. परंतु रणजितसिंह यांनी खासदार झाल्यानंतर पहिलं काम केले ते, आपल्या वाट्याचे बारामतीकडे जाणारे पाणी बंद केले. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आणि आता त्यांच्याच प्रयत्नाने नीरा देवघर कॅनॉलचे थांबलेले काम सुरू होत आहे त्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस भागातील कित्येक गावे पाण्याखाली येणार असल्याचे फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष ॲड. नरसिंग निकम यांनी सांगितले.

        नीरा देवघरचे वाघोशी येथे बंद पडलेले कॅनॉलचे काम खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा सुरू होत आहे, येत्या आठ ते दहा दिवसात या कामाच्या निविदा निघणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर खंडाळा, फलटण, माळशिरस या भागातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळणार आहे. या परिसरात सर्वत्र फळबागा होणार आहेत. सर्व शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्याचे फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी सांगितले.

    याप्रसंगी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले,  तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, वाघोशी गावचे सरपंच यांनी मनोगते व्यक्त केली.

No comments