Breaking News

कोणाला पडायचंय ते नक्की आहे ; तू फक्त उभाच रहा, तुला पाडूनच दाखवणार - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (छाया - योगायोग फोटो)  
You just stand for the election, you will be defeated - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ जून - ज्या पद्धतीने  १९९६ साली त्यांचे वडील चुकून निवडून आले होते, त्याच पद्धतीने खासदार  मागील वेळी माळशिरस मुळे निवडून आलेले आहेत.  आपण त्याच वेळी निश्चय केला होता की यांना पाडायचे, आता तुम्ही बीजेपी कडून उभे रहा किंवा कोणत्याही पक्षाकडून उभे राहिला तरी, तू फक्त उभाच रहा, आम्ही तुला पाडूनच दाखवणार आहे. असा इशारा विरोधकांना देऊन, फलटण तालुक्याला गेले तीस वर्षात विकासाच्या दृष्टीने, शैक्षणिक, औद्योगिक दृष्टीने जी काही आपण वाटचाल आणि संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला यश मिळाले आहे, आजारी कारखाने आपण बाहेर काढलेले आहेत, पाणी आणून, तालुका बागायती केला आहे, या तालुक्यावर जिल्ह्यावर कोणतेही संकट आले तरी आम्ही धावून जाणारी माणसं आहोत,  विकासासाठी काम करणारी माणसे, कार्यकर्ते एका बाजूला आणि दुसरीकडे या सर्वापासून दूर असणारे विरोधक  आहेत. आता  आपल्या दृष्टीने एकच उद्दिष्ट आहे, आणि ते म्हणजे, तू फक्त उभाच रहा, आम्ही तुला पाडूनच दाखवणार आहे असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदारांना दिला.

व्यासपीठावर उपस्थित  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, सारंग पाटील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,  बाळासाहेब सोळस्कर, नरेंद्र भोईटे, डी. के. पवार, धनंजय पवार

    फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बूथ प्रमुख व सदस्यांच्या मेळाव्याचे आयोजन आज रविवार दि.२५ जून रोजी महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे  करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र बुथ कमिटी प्रभारी  आ.शशिकांत शिंदे, आ.दिपकराव चव्हाण, आ. अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, बाळासाहेब सोळस्कर, नरेंद्र भोईटे, डी. के. पवार, धनंजय पवार, डॉ. बाळासाहेब शेंडे, सौ. रेशमा भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

    माढा मतदारसंघात मी उभा राहीन किंवा संजीवराजे उभे राहतील! कोणी का उभे राहिना, आपल्याला कोणाला पाडायचा आहे ते नक्की आहे, पार्टी ठरवेल किंवा आम्ही दोघं विचार करून, कोण उभे राहायचे ते ठरवू, काही लोकांना वाटतंय रामराजे, संजीवराजेंना  चान्स देत नाहीत, मला त्यांना एवढेच सांगायचं आहे, मी असे करणे शक्य नाही,  माझ्या सर्व यशामध्ये संजीवराजे यांचा ६० टक्के वाटा आहे व ४० टक्के माझा वाटा आहे. आमच्या घरात काय चाललंय ते पाहू नका, तुमचे घर कसे वाचवायचे ते पहा असा इशारा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला.

    बूथ कमिटी सदस्यांनी आपल्या शेजारी किंवा आसपास असणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबांशी संपर्क ठेवून, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा, बाकी हिंदुत्वाचे राजकारण हे बाजूला ठेवावे, कारण आपली फलटणची संस्कृती तशी नाही. आपली संस्कृती शांतताप्रिय आहे. फलटण तालुक्यात फलटण संस्थांनमध्ये सर्व जाती धर्म व्यवस्थित राहत होती, आपल्याला ती संस्कृती जपायला लागणार आहे,  एक जातीय दंगल सोडली तर आपल्या फलटणमध्ये कधी जातीय  भांडणे झालेली नाहीत, त्यामुळे जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने पुढे येणाऱ्या व्यक्तीला, पक्षाला आपल्याला थांबवायला लागणार आहे. त्यासाठी गावागावातील तंटे मिटवायला लागणार आहेत असे स्पष्ट करून, गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन, त्यांचा समन्वय घडवून एकत्र करून, येत्या दहा ते पंधरा दिवसात बूथ कमिट्यांची  निर्मिती करून, एक आदर्शवत पद्धतीने काम करण्याचा शब्द कार्यकर्त्यांच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना दिला.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना सारंग पाटील

    बुथ कमिटी प्रमुख व सदस्य म्हणजे फक्त मतदानादिवशी टेबल टाकून बसायचे एवढेच काम नाही तर, आपल्या प्रभागात आपल्या गावात मतदारांच्या अडीअडचणी आहेत त्या नेत्यांपर्यंत पोहोचवणे, आपल्या बूथ परिसरात पाच वर्षे कायम सक्रिय राहणे,  त्याचबरोबर आपल्या नेत्याला आपल्या बूथ मतदारांचे अपडेट देणे असे काम आहे. साधारणपणे एका विधानसभा मतदारसंघात तीन लाख मतदार असतात. त्याची विभागणी करून साधारण १००० मतदारांचा एक बूथ निवडणूक आयोग तयार करत असतो, त्या १००० मतदारांची यादी म्हणजे बूथ होय.  त्या एका बूथवर पक्षातर्फे, नेत्यातर्फे नेमणूक केलेली समिती म्हणजे बूथ कमिटी होय. त्यामध्ये एक प्रमुख व १० किंवा जास्त सहकारी असतात, त्या प्रत्येक सदस्याने शंभर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा तसेच त्यांचे अपडेट्स आपल्या नेतृत्वाला द्यावे, म्हणजे नेतृत्व त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी दिली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी मान्यवरांची भाषणे झाली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम नलावडे यांनी केले तर आभार विजयसिंह जाधव यांनी मानले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, तालुकाध्यक्ष सतीश माने व जयकुमार इंगळे यांनी केले.

No comments