जैन साधू हत्येच्या निषेधार्थ फलटण येथे सकल जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा
![]() |
मोर्चाच्यावतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारताना महसूल अव्वल कारकून मनोज काकडे आणि अव्वल कारकून शिवाजी जगताप |
गंधवार्ता (गंधवार्ता वृत्तसेवा) - कर्नाटक राज्यात दिगंबर जैन साधू यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध करीत या घटनेचा केंद्रीय तपास यंत्रणा मार्फत शोध घेऊन गुन्हेगारांना कडक शासन करावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचे पंतप्रधान यांचे नावे असलेले निवेदन मुक मोर्च्याद्वारे येथील महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.
![]() |
मोर्च्यात सहभागी जैन स्त्री - पुरुष आणि तरुण वर्ग. |
सकल जैन समाज, फलटण यांच्या तर्फे देण्यात आलेल्या या निवेदनावर जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेल महाराष्ट्र उपाध्यक्ष अनुप शहा, सुमित दोशी, यशराज गांधी यांची नावे आहेत.
कर्नाटक राज्यात चिकोडी गावानजिक उभारण्यात येत असलेल्या जैन तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी जैन आचार्य श्री १०८ कामकुमार नंदिजी महाराज यांची दि. ५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली असून या समाज विघातक कृत्याचा सकल जैन समाजा तर्फे जाहीर निषेध व्यक्त करीत समाजातील शेकडो स्त्री - पुरुष, तरुणांनी आज (बुधवार) सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चाने अधिकार गृह इमारती समोर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाजपा अल्पसंख्यांक सेल महाराष्ट्र उपाध्यक्ष अनुप शहा यांनी या दुर्दैवी घटनेबाबत सविस्तर माहिती देवून जैन साधू - साध्वी नेहमी पायी विहार (प्रवास) करीत असल्याने त्यांना विहार दरम्यान पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.
विहार दरम्यान अनेक साधू - साध्वी यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत, त्यांना जाणीव पूर्वक वाहनांखाली चिरडून मारण्यात आल्याच्या निंदनीय घटना विचारात घेता यापुढे साधू - साध्वीजींना विहार दरम्यान पोलिस संरक्षण आवश्यक असल्याचे अनुप शहा यांनी निदर्शनास आणून दिले.
भारतामध्ये अल्पसंख्यांक असलेल्या जैन समाज, या समाजाचे ट्रस्ट, देवस्थान आणि धर्मगुरुंना कायदेशीर मार्गाने पोलिस संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली असून त्याशिवाय जैन धर्मगुरु पायी प्रवास करीत असताना त्यांना प्रवासा दरम्यान रस्त्यात असलेल्या शाळा महाविद्यालयात वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण खात्याने नियमात आवश्यक बदल करुन त्याबाबत संबंधीतांना योग्य सूचना तात्काळ द्याव्यात, जैन धर्मगुरु पायी विहार करीत असताना काही समाज कंटकाकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत, गेल्या ५ वर्षांमध्ये हजारो जैन साधू याचे बळी ठरले आहेत, त्यामुळे विहार दरम्यान एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत जैन साधुंना पोलिस संरक्षण मिळावे, सदर दुर्दैवी घटना घृणास्पद निश्चित आहे, पण ती अत्यंत नियोजन पूर्वक कट आखून करण्यात आली असल्याने या कटात सामील असणाऱ्या सर्व संशयितांना त्वरित शोधून त्यांच्या विरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करताना संशयीत ताब्यात येईपर्यंत घटना स्थळी पोलिस संरक्षण मिळावे, सदर संशयीत आरोपी हे कर्नाटक व अन्य राज्यातील असल्याची माहिती मिळत असल्याने या घटनेचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांच्या (सीबीआय) माध्यमातून केला जावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
भाजपा अल्पसंख्यांक सेल महाराष्ट्र उपाध्यक्ष अनुप शहा यांनी या घटनेबाबत उपलब्ध माहिती उपस्थितांना देत या घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी केली.
No comments