Breaking News

नीरा उजवा कालवा अस्तरीकरण विरोधात ट्रॅक्टर, बैलगाडी सह शेतकऱ्यांचा मोर्चा

Farmers march with tractors, bullock carts against Neera Right Canal lining

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : साखरवाडी, सुरवडी, तडवळे, डोंबाळवाडी, रावडी बुद्रुक, मुरुम, कुसुरसह साखरवाडी पंचक्रोशीतील स्त्री - पुरुष तरुणांसह सुमारे ८ ते १० हजार शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकी सह प्रचंड धडक मोर्चाने तहसील कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला असलेला विरोध दर्शवीत अस्तरीकरण त्वरित थांबले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

    नीरा उजवा कालवा अस्तरीकरण झाल्यास पाझर बंद झाल्याने कालवा परिसरातील विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊसासह अन्य पिकांची शेती कायमची कोरडवाहू होण्याचा धोका असून, जनावरे व लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचा धोका ओळखून साखरवाडी पंचक्रोशीतील शेतकरी स्त्री - पुरुष, तरुणवर्ग, शेतमजूर ग्रामस्थांनी गेल्या सुमारे २/३ महिन्यांपासून कालवा अस्तरीकरण प्रक्रियेला विरोध करण्यासाठी बैठका, निवेदने, ग्रामसभा, ग्रामपंचायत ठराव वगैरे मार्गाने विरोध केला, मात्र सदर अस्तरीकरण प्रक्रिया थांबण्याऐवजी ठेकेदारांमार्फत प्रत्यक्ष कामकाज सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अस्तरीकरण प्रक्रिया थांबवून यापुढे ही प्रक्रिया कायम स्वरुपी थांबली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता आणि तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर, बैलगाडी सह आपल्या बायका मुलांना घेऊन आज (मंगळवारी) प्रचंड मोर्चा काढून विरोध स्पष्ट केला.


     स्वातंत्र्य पूर्व काळात सुमारे १०० वर्षांपूर्वी नीरा उजवा कालवा या भागात आला, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे ऊस शेतीला प्रेरणा, मार्गदर्शन मिळाल्याने या भागात ऊसाचे क्षेत्र वाढत राहिले, सोमेश्वर, श्रीराम, फलटण शुगर या साखर कारखान्यांमुळे ऊस गाळप होऊ लागले, त्या दरम्यान शासनाने या शेतकऱ्यांच्या काही जमिनी काढून घेऊन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना केली. वाढत्या कुटुंब व्यवस्थेत उर्वरित जमिनीची विभागणी होत गेल्याने थोडक्या क्षेत्रात शेतकऱ्यांचा चरितार्थ चालविणे कठीण होत असताना अहोरात्र मेहनत घेत, प्रसंगी शेतीपूरक म्हणून शेतकऱ्यांनी दूग्ध व्यवसाय सुरु केला मात्र शेतमाल आणि दुधाला समाधानकारक दर नाही, उत्पादन खर्चाला मर्यादा नाही अशा संकटात शेती व्यवसाय सापडला पण शेतकरी मार्ग काढत झगडत राहिला.

    दरम्यान शेती महामंडळाकडील जमिनीला मिळणारा खंड वाढवून मिळावा यासाठी संघर्ष करण्यात दोन पिढ्या संपल्या, त्यानंतर आता खंड वाढ नको खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करा यासाठी या शेतकऱ्यांनी तीव्र लढा उभारला अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर सुमारे १० वर्षांपूर्वी त्या लढ्याला यश आले आणि शेकडो हेक्टर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाल्या, शेतकऱ्यांनी बँकेतून मोठी कर्जे घेऊन विहिरी, विंधन विहिरी काढून या जमिनीत शेती सुरु केली, काहींनी  कालव्या लगत गुंठा/दोन गुंठे जमिनी चढ्या दराने विकत घेऊन तेथे विहिरी पाडल्या आणि नीरा - देवघर धरणाच्या पाण्याची वाट पाहून थकल्यानंतर सुमारे १०/१५ कि.मी. अंतरापर्यंत पाईप लाईन करुन पाणी नेऊन ते क्षेत्र बागायती केले आहे. 

    अशा परिस्थितीत आता नीरा उजवा अस्तरीकरण झाले तर कोट्यावधींची कर्जे काढून पाडलेल्या विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडण्याचा धोका असल्याने त्यानंतर आज नुकसानीची असली तरी किमान चलन फिरविणारी शेती पाण्याअभावी पिकलीच नाही तर या शेतकऱ्यांवर उपासमारीची नव्हे आत्महत्येची वेळ येणार असल्याने या शेतकऱ्यांनी आपल्या बायकामुलांसह आंदोलन सुरु केले असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

    पाणी आटल्यानंतर कोट्यावधींची कर्जे डोक्यावर घेऊन शेती फुलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमच्या कुटुंबांचे काय असा सवाल उपस्थित करताना शेतीला जोड धंदा म्हणून सुरु केलेल्या दुग्ध व्यवसायातील जनावरांच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न या अस्तरीकरण प्रक्रियेमुळे निर्माण होणार असून त्यातून मिळणारे उत्पन्न ही बंद होणार असून त्यासाठी बँकांची कर्जे काढून खरेदी केलेली दुभती जनावरे कवडी मोलाने विकण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचेही आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    पाडेगाव ते राजाळे या कलव्या लगतच्या भागातील सुमारे ३०/३५ गावांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कालव्या लगत खोदलेल्या विहिरींवर अवलंबून असल्याने कालव्याचे अस्तरीकरणानंतर या विहिरी कोरड्या पडल्या तर या गावातील लोकवस्ती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होणार असल्याचेही आंदोलन कर्त्यानी निदर्शनास आणून दिले आहे.

    आज सकाळ पासून तहान भूक याचा कसलाही विचार न करता आंदोलन कर्ते शेतकरी आपल्या बायका मुलांसह ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकी वरुन या मोर्च्यात सहभागी झाले होते, दुपारी एक वाजता येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात दाखल होताच प्रचंड घोषणा देत आंदोलन कर्त्यांच्यावतीने खंड वाढीच्या लढयातील अग्रणी नेतृत्व

    क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करुन मोर्चा सुरु करण्यात आला. छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर मोर्चा नीरा उजवा कालवा कार्यालय व तहसील कार्यालय येथे पोहोचल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस यंत्रणेने अधिकार गृह इमारतीची गेट बंद केल्याने आंदोलन कर्त्यानी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रांताधिकारी सचिन ढोले, नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता बोडखे, तहसीलदार अभिजीत जाधव यांना आंदोलन कर्त्यानी निवेदने देवून अस्तरीकरण त्वरित थांबविण्याची मागणी केली.

      निवेदनाच्या प्रती सोबत विविध गावातील ग्रामसभांचे ठराव सुपूर्द करण्यात आले आणि या मागणीसाठी साखरवाडी परिसरातील ८/१० गावांनी आज कडकडीत बंद पाळल्याचे या अधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून देण्यात आले.

    निवेदन दिल्यानंतर तेथेच झालेल्या सभेत अमोल खराडे यांनी हा लढा कोणत्याही राजकीय पक्ष संघटने विरुद्ध किंवा त्यांच्या माध्यमातून नसल्याचे स्पष्ट करीत हे पक्ष विरहित शेतकऱ्यांनी उभारलेले आंदोलन असून अस्तरीकरण निर्णय रद्द होईपर्यंत हे आंदोलन अखंडित सुरु राहणार असून प्रसंगी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

    नीरा उजवा कालवा अस्तरीकरणा प्रमाणेच नीरा नदीतील प्रदूषणामुळे या भागातील शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत नीरा नदीवरील उपसा सिंचन योजना उभारण्यासाठी लक्षावधी रुपयांची कर्जे घेतली असून आज प्रदूषणामुळे या पाण्याने शेती नापेर होण्याचा धोका निर्माण झाल्याने त्याबाबत ही शासन प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी अमोल खराडे यांनी केली.

नीरा उजवा कालवा अस्तरीकरण प्रश्नी शासनाने न्याय द्यावा : आ. दिपकराव चव्हाण
    फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा उजवा कालवा अस्तरीकरण योजनेस केलेला विरोध, आज त्यांनी काढलेला प्रचंड मोर्चा, १४ गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेतील एकमुखी ठरावाद्वारे नोंदविलेला विरोध लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या भावना समजावून घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आ. दिपकराव चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने आज विधी मंडळात केली आहे.

No comments