शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी नोंदणी करावी : प्रांताधिकारी सचिन ढोले
फलटण - पीक पाहणी द्वारे विविध पिकांखालील क्षेत्राची निश्चित माहिती झाल्याने कृषी विषयक धोरणे ठरविणे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे निदर्शनास आणून देत शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे प्रत्यक्ष शेतावर जावून ई - पीक पाहणी नोंदणी करावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
कृषी दिन, कृषी संजीवनी सप्ताह समारोप, जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्यावतीने शेतकऱ्यांना आंबा व नारळ रोप वाटप आणि ई - पीक पाहणी नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळा अशा संयुक्त कार्यक्रमात धुमाळवाडी ता. फलटण येथे मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, डॉ. प्रसाद जोशी, महसूल मंडलाधिकारी प्रकाश नाळे आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो महासन्मान योजना मधून प्रत्येकी ६ हजार रुपये याप्रमाणे प्रतीवर्षी १२ हजार रुपये मिळणार असल्याचे निदर्शनास आणून देताना जोशी हॉस्पिटल मार्फत आंबा व नारळ रोप वाटप उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
शेतकरी व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी एकत्र येऊन फळ प्रक्रिया उद्योगाची उभारणी केल्यास फळांवर प्रक्रिया करुन उत्पादित ज्यूस, जाम, जेली आणि फळ ड्राय आदी उत्पादनाद्वारे फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ बागेतून अधिक पैसा मिळविता येऊ शकतो याची ग्वाही देत येथील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत प्राधान्याने प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.
आपल्या कुटुंबाची फळांची गरज भागविण्यासाठी आणि निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेतकऱ्यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाला प्राधान्य द्यावे यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे तसेच जागतिक तापमान वाढीमुळे अवेळी पाऊस, गारपीट व वादळी वारे आणि बदलते निसर्गचक्र सुधारणे यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोनचाफा आणि आंबा व नारळ वृक्षारोपण करण्यात आले, तसेच १५० शेतकऱ्यांना जोशी हॉस्पिटल, फलटणच्यावतीने आंबा, नारळ रोप वाटप करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक कृषि अधिकारी अमोल सपकाळ यांनी केले. सूत्र संचालन, समारोप व आभार कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी मानले. कार्यक्रमास धुमाळवाडी व पंचक्रोशीतील शेतकरी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
No comments