मुंजवडी येथे ५ लाख रूपयांचा गांजा जप्त

फलटण : फलटण तालुक्याच्या पुर्व भागातील मुंजवडी येथे स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी केलेल्या कारवाईमध्ये पाच लाख रुपये किंमतीचा वीस किलो गांजा व एक लाख रुपयांच्या दोन मोटरसायकल असा एकुण सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये नमुद केले आहे की, पोलिस अधिक्षक समिर शेख व अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर यांनी अंमली पदार्थ गांजांची विक्री, लागवड, वाहतूक करणार्यांविरुध्द कारवाया कराव्यात अशा सुचना स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. त्यानुसार देवकर यांना मुंजवडी येथे एकजण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी प्राप्त झालेल्या माहितीनुसार विशेष पथक तयार करुन त्यांनी मुंजवडी येथे सापळा रचला.
त्यानुसार दि. ३ जुलै रोजी गावातील माध्यमिक शाळेजवळ मोटर सायकलवरुन गांजा विक्रीसाठी आलेल्या एका इसमास ताब्यात घेतले. त्याच बरोबर तेथे गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या अन्य इसमासही पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीचा वीस किलो गांजा व एक लाख रुपयांच्या दोन मोटरसायकल असा एकुण सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे परंतू अटक केलेल्यांची नावे पोलिसांनी जाहिर केली नाहित.
सदर कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळूंखे, अमोल माने, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अमित माने, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, स्वप्नील दौंड, वैभव सावंत, संभाजी साळुंखे यांनी केली.
No comments