पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली कालवा सल्लागार समितीची बैठक
सातारा - धोम, धोम बलकवडी, कण्हेर व उरमोडी या चार मोठ्या प्रकल्पांची खरीप हंगाम 2023-24 ची कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई,यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्य प्रणालीद्वारे सम्पन्न झाली.
सदर बैठकीस सातारा व सांगली जिल्ह्यातील श्रीनिवास पाटील, संजय काका पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, अनिल बाबर, महेश शिंदे, दिपक चव्हाण, मकरंद पाटील, अरुण लाड, विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे, अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा व सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा तसेच जलसंपदा विभागातील संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये उन्हाळी हंगाम सन 2022-23 च्या झालेल्या पाणी वापरास मान्यता देण्यात आली. तदनंतर सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा व पर्जन्यमानास अनुसरुन होणारा पाणीसाठा याबाबत चर्चा झाली. माण, खटाव व फलटण तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे सदर तालुक्यांतून सिंचनासाठी पाण्याची मागणी होती. त्यास अनुसरुन धोम, धोम बलकवडी व उरमोडी प्रकल्पातून सिंचनासाठी पाण्याच्या विसर्गास परवानगी देण्यात आली. तसेच कण्हेर प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 33% पेक्षा जास्त झाल्यानंतर व लाभ क्षेत्रातून मागणी प्राप्त झाल्यानंतर सिंचन आवर्तन सुरू करणेस मंजुरी मिळाली.
No comments