Breaking News

आगामी काळात कोणालाही पाणी प्रश्नावर राजकारण करुन निवडणूक लढवता येणार नाही - खासदार रणजितसिंह

In the future, nobody will be able to contest elections by playing politics on the water issue - MP Ranjitsinh

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले सिंचनाचे सर्व प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मार्गी लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले असून, नीरा देवघर प्रकल्पास केंद्राच्या सिडब्लूसी ची मान्यता मिळाली आहे. आता प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी कोणतीच अडचण नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये कोणालाही पाणी प्रश्नावर राजकारण करुन निवडणूक लढवता येणार नाही, असे स्पष्ट मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले

    कोळकी ता. फलटण येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, ऍड. नरसिंग निकम, जयकुमार शिंदे, विश्वासराव भोसले, अभिजीत नाईक- निंबाळकर, सचिन कांबळे पाटील, लातीफभाई तांबोळी, राजेश शिंदे उपस्थित होते.

    मागील महिन्यात फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये बारामती रेल्वे, धोम-बलकवडी बारमाही करण्याचे टेंडर, नीरा - देवघरचे विविध सुमारे 550 कोटी रुपयांचे टेंडर तसेच अजून सुमारे 200 कोटींचे नीरा - देवघरचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. काल कृष्णा फ्लड डायव्हर्जन प्रकल्पला राज्य सरकारने मान्यता दिली. याचे फक्त सर्वेक्षणचे टेंडर सुमारे 50 कोटींच्या वर आहे. कृष्णेचे पाणी फलटणमार्गे    बाणगंगा नदीतून पुढे नीरा नदीत जाणार आहे. यामध्ये जवळपास 5 टीएमसी पाणी हे फलटण तालुक्यासाठी आरक्षित करणार आहे. यामध्ये बाणगंगा धरण भरून सुद्धा बाणगंगा नदी बारमाही करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

    या प्रकल्पाममधून आपण अतिरिक्त पाणी हे भाटघर, वीर धरणात सोडणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे देवदूत बनून पाणी प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांचे आभार मानायचे कसे, हेच कळत नाही. या ठिकाणावरचा दुष्काळी भाग हा कलंक आता कायमस्वरूपी पुसणार आहे. कृष्णा फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्टमुळे फलटण, माण व माढा लोकसभा मतदारसंघाचे सिंचन चित्र आता बदलणार आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट

    दरम्यान विजयदादांना श्रेय जाऊ नये म्हणून शरद पवारांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडवल्याचा आरोप खासदार रणजितसिंह यांनी केला. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील दुष्काळी भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे श्रेय हे विजयसिंह मोहिते-पाटलांनाच जाते. हे श्रेय त्यांना जाऊ नये; म्हणूनच शरद पवार यांनी एवढी वर्ष कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडवला, असा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला. कृष्णा - भीमा या प्रकल्पामध्ये काही सुधारणा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रकल्प पुन्हा पुढे नेलेला आहे. या प्रकल्पासाठी विजयसिंह मोहिते- पाटील यांचे असलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.

    यावेळी बोलताना प्रल्हादराव साळुंखे-पाटील म्हणाले की, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे बाप से बेटा सवाई ठरले आहेत. स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी आधी लढा उभारला होता, त्यावेळी काहींनी चेष्टा केली होती... त्यांचे रेल्वेसह सर्व स्वप्न अपेक्षेपेक्षा जास्त काम करुन त्यांचे पुत्र खासदार रणजितसिंह यांनी सुरू केले. कोरोनाने काळ घालविला पण दीड वर्षात सगळं काम पूर्ण केले. त्यांचीही टिंगल केली गेली, पण झालेल्या कामातून विरोधकांना चपराक बसली. स्थानिक पातळीवर कामे व्हावीत हे स्व. हिंदुरावांचे स्वप्न साकार केले, या बाबत त्यांचा मित्र म्हणून मी खूप समाधानी आहे.

No comments