Breaking News

कुरवली दहशतीखाली आहे ; प्रशासनाने लक्ष द्यावे ; अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरणार - रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड

Kurwali is under terror; Administration should pay attention -Ripai district president Ashok Gaikwad 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - कुरवली गाव हे दहशतीखाली आहे, तरी  प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे व पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवावा, यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि जर योग्य कारवाई झाली नाही, न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. जिल्ह्यात देखील अनेक प्रश्न अनुत्तरणीय आहेत, त्यासाठी  हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून लढा उभा करणार आहे व आमच्या सुरक्षिततेची मागणी करत, या सातारा जिल्ह्यात एक नवा लढा उभा करणार  असल्याचे रिपाई जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी स्पष्ट केले.

कुरवली खुर्द ता.फलटण येथे शाळकरी मुलांच्या भांडणाच्या रागातून दलित महिला व तिच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून, विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी व इतरांच्या विरोधात पोक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रिपाई (अ) सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी कुरवली खुर्द येथे भेट दिल्यानंतर फलटण येथे पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी गायकवाड बोलत होते. याप्रसंगी रिपाई युवक प्रदेशाध्यक्ष स्वप्निलभाई गायकवाड, सातारा जिल्हा सचिव विजय येवले, जेष्ठ कार्यकर्ता संजय निकाळजे, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, वाई शहराध्यक्ष  बाजीगर इनामदार, विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाड, रिपाई मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील मांढरे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रमेश मिसाळ, युवा तालुका अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, राजू जगताप, प्रमोद काकडे, गणेश भोसले, जॉन जोसेफ, गणेश महागडे, सतीश अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, मारुती मोहिते, प्रवीण शेळके, सलीम शेख, ज्योत्स्ना सरतापे, विमल काकडे, राखी कांबळे, अलका बनसोडे, आशा काकडे, वंदना यादव, जयश्री अहिवळे, ज्योती अहिवळे, सारिका अहिवळे, माया अहिवळे रुक्मिणी वाघमारे उपस्थित होते.

पुढे बोलताना अशोक गायकवाड म्हणाले, कुरवली या गावी घडलेला प्रकार हा  दुःखदायक असून, आज कुरवली गावाला भेट दिल्यानंतर मन  हलवून गेले होते आणि प्रश्न पडला की खरंच या देशांमध्ये दलित सुरक्षित आहे का ? पोलीस प्रशासनाने या प्रकरणी दखल घेऊन गुन्हे दाखल केले परंतु फक्त गुन्हे दाखल होऊन चालणार नाही तर त्या पीडित कुटुंबाला सुरक्षितता मिळाली पाहिजे, परंतु तसे वातावरण गावामध्ये दिसले नाही. गावामध्ये कोणीही बाहेर आले नाही, त्यामुळे गावांमधील नागरिक हे दहशतीच्या सावलीखाली आहेत असे वाटते, ज्या वेळी अशी घटना घडतात त्यावेळी त्या पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो, परंतु तसा बंदोबस्त आम्हाला कुरवली येथे दिसला नाही. कुरवली गावातील पाहणी करून आम्ही फलटण येथे उपविभागीय पोलिस अधिकारी धस यांची भेट घेतली व चर्चा केली. तिथे आम्हाला पीडित महिला उपचार घेण्यासाठी नातेवाईकांकडे गेली असल्याचे समजले, जर ती खरंच उपचारासाठी गेली असेल तर ठीक आहे, परंतु ती दहशतीमुळे गेली असेल तर कुरवली गाव हे किती दहशतीच्या सावलीखाली आहे ते स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले.

No comments