Breaking News

वाखरी गावातील शाळेची दुरावस्था ; मुलांच्या जीवितास धोका - सरपंच शुभांगी शिंदे

Poor condition of the school in Wakhri village; Threat to children's lives - Sarpanch Shubhangi Shinde

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - वाखरी(ता फलटण) येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची संस्थाचालकांच्या दुर्लक्षामुळे मोठी दुरावस्था आणि पडझड झालेली आहे. यामुळे शालेय मुलांच्या जीविताला धोका निर्माण होत असून संस्थाचालकांनी नवीन इमारत न बांधल्यास इतर नामांतिक शाळेला गावात शाळा चालविण्यासाठी पाचारण करू असा इशारा सरपंच शुभांगी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

     वाखरी (ता फलटण) येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची इमारत जुनी झाल्याने इमारतीची पडझड झालेली आहे. त्या पार्शभूमिवर शाळेच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच शुभांगी शिंदे बोलत होत्या.यावेळी तुकाराम शिंदे,उपसरपंच गणपत मोहिते,वाखरी सोसायटीचे चेअरमन दादा ढेकळे,तंटामुक्ती अध्यक्ष संतोष ढेकळे आदी उपस्थित होते.

वाखरीतील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूलची  स्थापना सन १९६२ साली   करण्यात आली. ती शाळा त्यावेळेस वाखरी ग्रामस्थांनी लोक वर्गणी व श्रमदान करून उभी केली. ही इमारत उभी करत असताना दगड, माती, यामध्ये बांधकाम केले गेले. त्यामुळे ती इमारत आता ५० वर्षानंतर पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. इमारत कधी पडेल हे सांगू शकत नाही.  या संस्थेचे अध्यक्ष,सचिव मुख्याध्यापकांस वारंवार सांगूनसुद्धा  संस्था इमारत दुरुस्तीकडे  दुर्लक्ष करीत आहे असे शुभांगी शिंदे यांनी सांगितले.

  सध्या तिथे ५ वी ते १० वी अशी शाळा भरत असून १८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारतीची पडझड झाल्याने गावातील मंदिर, समाजमंदिर, व पडायला आलेली शाळा यामध्ये विद्यार्थी बसत आहे. ही शाळा कधी पडेल हे सांगू शकत नाही.  मोठा पाऊस आल्यास माळीन  व इर्शाळवाडी सारखी दुर्घटना घडू शकते. पंचक्रोशीत या मुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या वरती विशेष ग्रामसभा बोलावून ठरावही घेण्यात आले आहेत. इमारतीची दुरुस्ती न झाल्यास इतर संस्थांना शाळा नवीन सुरू करण्यासाठी पाचारण करू असा इशारा शुभांगी शिंदे यांनी दिला.

No comments