Breaking News

कृष्णा खोरे फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्टला तत्वता मान्यता - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

Principle Approval of Krishna Khore Flood Diversion Project - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    गंधवार्ता (गंधवार्ता वृत्तसेवा) - वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले असून, त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक घेऊन, कृष्णा खोरे फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्टला तत्वता मान्यता देण्यात आल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

      दि.१२/७/२०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जलसंपदा विभागाचे सचिव  दीपक कपूर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपोले,  अधिक्षक अभियंता कुमार पाटील,  चिफ इंजिनिअर  गुनाले, कार्यकारी अभियंता योगेश सावंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. 

    पावसाळ्यामध्ये  कोल्हापूर, सांगली  व साताऱ्यातील काही भाग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतुन  जे पाणी वाहून जाते त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनजीवन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये  होत असते, यासाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी, हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी, आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन, या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल. यासंदर्भामध्ये  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास सादर बाब आणून दिल्यानंतर, उपमुख्यमंत्री यांनी तातडीची बैठक घेऊन, आज या प्रकल्पाला तत्वता मान्यता दिली आहे. 

     हा प्रकल्प अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा असून  त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद आज करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.  यामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठी भेट आज फडणवीस साहेबांनी दिली व भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटणार आहे, हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होईल तसेच हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

No comments