Breaking News

फलटण येथे सेशन कोर्टं मंजुरीसह इमारतीसाठी १०० कोटींची तरतूद : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करताना वकील संघाचे आजी माजी अध्यक्ष व अन्य पदाधिकारी शेजारी मान्यवर
Provision of 100 crores for the building at Phaltan with the approval of the Sessions Court: MP RanjitSingh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटणकरांची विशेषतः फलटण वकील संघाची अनेक वर्षांची जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची (District & Additional Sessions Court) प्रलंबीत मागणी तर पूर्ण केली आहेच, पण आता न्यायालयासाठी २ हेक्टर शासकीय जागा आणि त्यावर इमारतीसाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद करुन घेऊन सर्व साधने, सुविधांनी सुसज्ज प्रशस्त न्यायालय इमारत लवकरच उभारण्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

     फलटण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (District & Additional Sessions Court) अंतीम मंजुरी मिळवून दिल्याबद्दल अधिकार गृह इमारतीमधील फलटण न्यायालय वकील संघ कार्यालयात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फेटा बाधून, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ देवून वकील संघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नरसिंह निकम, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, गणेश चिवटे, धनंजय साळुंखे पाटील, अशोकराव जाधव, सचिन कांबळे पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजित पठाण व त्यांचे सहकारी पदाधिकारी, संघाचे आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्यांना न्यायासाठी जिल्ह्यात जावे लागू नये

    सर्व सामान्यांना न्याय मागण्यासाठी किंवा कोणत्याही प्रशासकीय कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपला वेळ, पैसा, श्रम नाहक खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये या भावनेतून आपण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय येथे मंजूर करुन घेतले आहे. आता शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार अथवा कोणाही सर्वसामान्य व्यक्तीस अपिलासाठी सातारा येथे जावे लागणार नाही, येथे सुमारे ३०० वकील असून सर्व मेहनती, अभ्यासू, पक्षकाराला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे असल्याने या न्यायालयाचा निश्चित उपयोग फलटणकरांना होईल असा विश्वास खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
बारामती पेक्षा अधिक सुविधा, शासकीय कार्यालये, औद्योगिक वसाहत फलटण मध्येही असणार

    खा. शरद पवार व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी प्रदीर्घ काळ सत्ता असल्याने त्या माध्यमातून जे बारामती मध्ये केले ते अत्यंत अल्पावधीत फलटण मध्ये करण्याचा, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला मानस होता, तथापि खासदार म्हणून दिल्लीत जावून कामकाज पद्धती समजावून घेत असताना कोरोना सुरु झाल्याने दोन अडीच वर्षे त्यामध्ये गेली, त्यानंतर महाराष्ट्रात सुमारे ११ महिने आपले सरकार नव्हते, उर्वरित दीड वर्षाच्या कालावधीत विकासाचा रथ वेगवान करुन अपेक्षीत स्थळी पोहोचविणे अवघड होते पण प्रसंगी प्रकृती, जेवण, विश्रांती याकडे लक्ष न देता अहोरात्र कार्यरत राहिल्याने विकास रथ केवळ गतिमान केला नाही तर इच्छित स्थळी पोहोचविणार असल्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
    लोणंद - फलटण - बारामती रेल्वे मार्गापैकी लोणंद - फलटण रेल्वे मार्ग पूर्ण करुन पहिल्या ३ महिन्यात त्यावरुन फलटण - लोणंद - पुणे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु केली मात्र बारामतीकरांच्या विरोधामुळे फलटण - बारामती मार्ग रखडला होता, मात्र ते कामही आता सुरु झाले असून लवकरच त्यामार्गावरुन केवळ फलटण - बारामती नव्हे तर विदर्भ मराठवाड्यातून सांगली - कोल्हापूर - बेंगलोर पर्यंत प्रवासी व माल वाहतूक रेल्वेने सुरु करण्याची ग्वाही देत येथून पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, बेंगलोर, सोलापूर, हैद्राबाद वगैरे दूर अंतरावर रेल्वे प्रवासी व मालवाहतूक सुरु करण्याची ग्वाही देत फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरु असून तो मार्गही सुरु होणार असून मुंबई - हैद्राबाद बुलेट ट्रेन फलटण - बारामती - अकलूज वगैरे आपल्या मतदार संघातून नेण्याचा आपला प्रयत्न असून अवघ्या २२ मिनिटात पुण्यात पोहोचण्याची संधी फलटण करांना त्याद्वारे उपलब्ध होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण रेल्वे स्टेशनचा समावेश रेल्वेच्या अमृत भारत योजनेत झाल्याने या रेल्वे स्टेशनच्या अप ग्रेडेशन व अद्यावती करण्यासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध झाले असून फलटण रेल्वे स्टेशन मुंबई - पुण्याच्या धर्तीवर अद्ययावत रेल्वे स्टेशन होणार असल्याची ग्वाही खा. नाईक निंबाळकर यांनी दिली.

रेल्वे प्रमाणे फलटण - बारामती, फलटण - आदर्की रस्त्यांप्रमाणे अहमदनगर - सांगली हा राष्ट्रीय महामार्ग फलटण मधून जाणार आहे तर पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण न करता त्याला समांतर राष्ट्रीय महामार्ग फलटण मार्गे नेवून त्याच्या बाजूला इंडस्ट्रियल कॉरिडॉर, विमानतळ उभारणी करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चाचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

आळंदी - पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम वेगात सुरु असून त्यापैकी फलटण तालुक्यातील कामासाठी १२०० कोटी रुपये खर्च होणार आहे, तर शहरातून जाणाऱ्या पालखी राष्ट्रीय महामार्गासाठी ८५ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगताना पालखी राष्ट्रीय महामार्ग  शहराबाहेरुन जात असून त्याचे कामही वेगात सुरु असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण शहरातील सर्व ७० रस्ते अगदी गल्ली बोळातील रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद केली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सदर कामे सुरु होणार आहेत, वीज वितरण कंपनीची ३ नवीन सबस्टेशन मंजूर असून आगामी काळात फलटण शहर व तालुक्यात योग्य दाबाने, पुरेशा प्रमाणात, अखंडित वीज पुरवठा सुरु राहील आणि शेती पंपासह सर्वांना मागताक्षणी वीज जोडणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

नीरा - देवघर धरण गेली २० वर्षे पूर्ण क्षमतेने भरत असताना कालवे नसल्याने त्याचे पाणी बारामती, इंदापुरला दिले जात होते आणि फलटण तालुक्यातील ५१ गावे या धरणाच्या लाभ क्षेत्रात असून दुष्काळाशी सामना करीत पाणी येणार या अपेक्षेवर जगत होती, या प्रकल्पातील पाणी बंद पाईप मधून लाभ क्षेत्रात पोहचविण्याची ४ हजार कोटी रुपयांची योजना कार्यान्वित झाली असून पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपये उपलब्ध झाल्याने लवकरच पाणी लाभ क्षेत्रात पोहोचणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
   नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहत १२०० एकर क्षेत्रावर उभारण्यास यापूर्वी मंजुरी मिळाली असून ते काम सुरु असताना आणखी ४ हजार एकर क्षेत्र सदर औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित करण्यात येत आहे. या औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय १० मोठ्या कंपन्या येत असून त्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे, सदर औद्योगिक वसाहत पूर्णत्वास जाईल त्यावेळी तालुक्यातील तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याने तालुक्यात बेरोजगारी राहणार नसल्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

पाटबंधारे खात्याच्या विश्राम गृह परिसरातील ५ एकर जागेवर सिंचन भवन प्रशस्त इमारत उभारुन पाटबंधारे खात्याची जिल्हास्तरीय सर्व कार्यालये येथे एकत्र आणण्याचा निर्णय लवकरच कार्यान्वित होईल, तसेच फलटण येथे पासपोर्ट कार्यालय, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी, आर. टी.ओ. आदी शासकीय कार्यालये, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, भक्त निवास आदी उभारण्यास मान्यता घेतली असून टप्याटप्याने हे सर्व येथे सुरु होणार असल्याची ग्वाही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
   कृष्णा - भीमा स्थैर्यीकरण ही सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चाची महत्वाकांक्षी योजना आपण मंजूर करुन घेतली असून त्याच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत कृष्णा, कोयना, कुंभी, कासारी, पंचगंगा या ५ नद्यातून पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी मराठवाड्याकडे नेणारी ही योजना असून त्यापैकी ५ टीएमसी पाणी फलटण तालुक्याला मिळणार आहे. त्यातून नीरा - देवघर, धोम - बलकवडी लाभ क्षेत्राला काही पाणी देण्याचा तर काही पाणी बाणगंगा धरणात सोडून बाणगंगा नदी बारा महिने प्रवाहित ठेवून तिचे गटार गंगा हे स्वरुप बदलण्याचा निर्णय घेतल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
       आपल्याला वेळ कमी मिळाला असला तरी अपेक्षीत कामे पूर्ण करुन घेण्यासाठी भाजपची केंद्र व राज्य सरकारे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्य सरकार मधील मंत्री महोदयांनी चांगली साथ केल्याचे तसेच असून स्वतः केंद्रातील अनेक महत्वाच्या समित्यांवर असल्याने विकास कामांची पूर्तता करता आल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
       भाजप मध्ये येण्यापूर्वी माढा मतदार संघातील भाजप उमेदवारी जाहीर करण्यात असल्याचे निदर्शनास आणून देत, ५ विधान सभा मतदार संघांचा समावेश असलेला हा मतदार संघ तेथे प्रचाराला केवळ १५ दिवस मिळाल्याने कठीण परिस्थिती होती मात्र फलटणच्या मतदारांनी घरचा उमेदवार म्हणून ९६ हजार मते दिल्याचे निदर्शनास आणून देत लोकांच्या पाठिंब्याने लोकसभेत पोहोचलो असल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्तीचा आटोकाट प्रयत्न केल्याचे सांगत सर्वांना धन्यवाद देत या सदिच्छा, आशीर्वाद कायम ठेवा असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
   वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अजित पठाण यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय मंजुरी घटनाक्रम सांगताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याकामी केलेल्या मदत, मार्गदर्शन, सहकार्याबद्दल व्यक्तिशः व वकील संघाच्यावतीने त्यांना धन्यवाद देत आभार मानले.
       ॲड. नरसिंह निकम यांनी खा. रणजितसिंह यांनी खासदार पदाची व्याख्याच बदलून टाकत लोकप्रतिनिधी कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण घालून दिल्याचे सांगत अल्पावधीत विविध क्षेत्रात केलेल्या भरीव विकास कामांबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कौतुक केले.

No comments