Breaking News

फलटण - बारामती रेल्वेसाठी ६०० कोटी रुपये मंजूर ; फलटणकरांचे स्वप्न पूर्ण होणार - खासदार रणजीत सिंह निंबाळकर

Rs 600 crore sanctioned for Phaltan-Baramati Railway; Phaltankar's dream will come true - MP Ranjit Singh Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - बारामती रेल्वेचा रखडलेला प्रकल्प पूर्ण व्हावा अशी भूमिका घेऊन, तो सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये कै.माजी खासदार  हिंदुरावजी नाईक निंबाळकर व अन्य नेते व जनतेचे स्वप्न पूर्ण करताना मला आज आनंद होत आहे. गेली अनेक वर्ष रखडलेल्या फलटण ते बारामती या रेल्वेच्या जमिनीच्या अधिग्रहणानंतर रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून मी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते . त्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत.  व त्याची निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    फलटण - बारामती या रेल्वेमार्गावरील ब्रिज तयार करण्याची निविदा, मागील महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचे  काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. यानंतर आता रेल्वे लाईन टाकण्याचं काम प्रत्यक्षात सुरू होईल. लोणंद फलटण रेल्वे सुरू आहे, आता बारामतीकडे रेल्वे सुरू झाल्यानंतर फलटणकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहणार आहे. यासाठी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खूप मोठे सहकार्य लाभलेले आहे. फलटण तालुका हे रेल्वेचे मुख्य ठिकाण होणार आहे .या ठिकाणी अमृत स्टेशन योजना मंजूर झालेली आहे. त्यामुळे या भागाचा कायापालट  झाल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणेकडून जाणाऱ्या सर्व रेल्वे फलटण मार्गे दिल्लीला  जाणार त्यामुळे जनतेचा आर्थिक विकास होणार आहे .शेतकरी व्यापारी, विद्यार्थी, नोकरवर्ग, सर्वसामान्य प्रवासी या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे व फलटण हे देशाच्या नकाशावर दळणवळणाचे मोठे साधन म्हणून दिसणार आहे. इथून फलटण वरून मुंबई ,पुणे ,नोकरीसाठी ,शिक्षण, व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना माल पोचवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. जनतेने दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जेवढं या मतदारसंघासाठी काम करता येईल तेवढे काम मी जनतेसाठी करणार आहे असे मत खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी  व्यक्त केले .

No comments