शरद पवार यांची पत्रकार परिषद - यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र फिरणार ; माझा जनतेवर आणि विशेषतः तरुण पिढीवर प्रचंड विश्वास ; चित्र येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ जुलै - आजचा दिवस संपला की उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. प्रथम कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. कराड आणि सातारा येथे मेळावा घेणार आहे. आणि त्यानंतर राज्यात व देशात जेवढे जाता येईल आणि लोकांशी जेवढा संपर्क वाढवता येईल तेवढा कार्यक्रम माझ्याकडून केला जाईल आणि हीच माझी उद्याची रणनीती असणार आहे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद मांडली.
राज्याच्या राजकारणात भूकंप होऊन, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची व इतर नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जो संभ्रम निर्माण झाला होता, त्यावर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, येणाऱ्या ६ तारखेला मी पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती, त्या बैठकीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले होते, संघटनेचे धोरण ठरवण्यासंबंधी विचार करणार होतो, परंतु त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली, ती भूमिका घेऊन, आम्हीच पक्ष आहोत, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली. पक्षाचे काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, यासंबंधीचे चित्र येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. त्याचे कारण असे आहे की, ज्यांची नावे आली त्यापैकी काही लोकांनी आज माझ्याशी संपर्क साधून, मला सांगितले की, आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले गेले, आमच्या सह्या घेतल्या गेल्या आहेत, पण आमची भूमिका वेगळी आहे. पण याबाबतीत मी आत्ताच काही बोलू इच्छित नाही, कारण याचे स्वच्छ चित्र जनतेच्या समोर त्या सदस्यांनी मांडणे आवश्यक आहे. ते जर त्यांनी मांडले तर त्यांच्या भूमिकेवर माझा विश्वास बसेल आणि ते जर त्यांनी मांडले नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, परंतु मला हा नवीन नाही, 1980 साली निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो, त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते आणि एक महिन्याच्या नंतर त्या ५८ पैकी ५२ आमदार मला सोडून गेले होते. माझ्याबरोबर त्यावेळेस एकूण ५ आमदार राहिले होते. त्यावेळेस त्या पाच आमदारांना घेऊन, मी पक्ष बांधण्यासाठी बाहेर पडलो होतो, माझा उद्देश होता, की पुन्हा पक्षाची बांधणी करायची आणि निवडणूक झाल्यानंतर आमची संख्या वाढली होती. आमचे 69 जण निवडून आले. संख्या नुसतीच वाढली नाही, तर जे सोडून गेले होते, त्यापैकी तीन ते चार जण सोडले तर सर्व जण पराभूत झाले. त्यामुळे 1980 साली जे चित्र दिसलं, ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंबावर कसं उभं करता येईल, हा माझा एक कलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषतः तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला आठवत असेल कालची जी निवडणूक झाली चार वर्षांपूर्वीची निवडणूक झाली त्यावेळी देखील असे चित्र होते परंतु सबंध महाराष्ट्र मध्ये जिथे जाता येईल तिथे जाऊन मी पक्षाची भूमिका मांडली आणि त्याचा परिणाम विधानसभेत आमची संख्या वाढली व आम्हाला यश आले, आम्ही संयुक्तरीत्या आम्ही सरकार स्थापन केले होते.
आजचा दिवस संपला की उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे आणि कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि सातारा मेळावा घेणार आहे आणि त्यानंतर राज्यात व देशात जेवढे जाता येईल, आणि लोकांशी जेवढा संपर्क वाढवता येईल तेवढा कार्यक्रम माझ्याकडून केला जाईल आणि हीच माझी उद्याची रणनीती असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या धोरणाशी विसंगत पावले टाकली असतील तर ती योग्य नाहीत, त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक बसतील आणि त्यासंबंधीचा निकाल घेतील. पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदी सुनील तटकरे व प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली होती. माझं त्यांना स्पष्ट सांगणे आहे की, या प्रकारामध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जी पावले त्यांनी टाकायला हवी होती, ती पावले त्यांनी टाकली नाहीत. त्यामुळे आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नाही, त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, त्यासाठीची उचित अशा प्रकारची कारवाई त्यांनी, स्वतःहून करावी किंवा मला करावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिली.
No comments